नागपूर : राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर नागपुरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे’ 2100 रुपये कधी मिळणार, याची राज्यभरातील महिलांना प्रतीक्षा लागली आहे. महायुतीच्या विजयात गेमचेंजर ठरलेल्या या योजनेबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली आहे.
महिला डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत. जुलैपासून नोव्हेंबर पर्यंत, 5 महिन्यांचे एकूण 7500 रुपये आत्तापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे सरकारने महिलांना नोव्हेंबरचा हप्ता आधीच दिला होता.त्यातच महिलांना आता 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये, याबाबतही उत्सुकता आहे. महायुतीने निवडून आल्यानंतर 1500 ऐवजी 2100 रुपये देणार, अशी घोषणा केली होती.
आता महिलांना याचे पैसे कधी मिळणार, याबाबत स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. कुणीही मनात कोणतीच शंका ठेऊ नका. आम्ही जी जी आश्वासने दिली आहेत, ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्यातील कोणतीही योजना बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी विधानसभा निवडणुकीत महायुतीवर भरभरून प्रेम दाखवले, त्यांच्या बँक खात्यात आम्ही हे अधिवेशन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा करणार आहोत,असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आजच्या अधिवेशनात लाडक्या बहीण योजनेबाबत देखील महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, याच्या प्रक्रियेसाठी काही दिवस लागू शकतात. आता महिलांना संक्रांतीला डिसेंबरचा हप्ता मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लाडक्या बहीणींची संक्रांत गोड होणार आहे.