नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून आपण जनतेचे प्रश्न सोडवण्यास जास्तीत जास्त प्राधान्य देत असतो. मात्र विरोधकांनी अलीकडे अधिवेशनाला हलक्यात घेतले .
नागपूरमध्ये लंडनसारखं वातवरण आहे. काही जण आनंद, पर्यटन करून निघून जातात. त्यांना लोकांच्या प्रश्नांशी काही देणेघेणे राहिले नाही असं सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता खोचक टोला लगावला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना धारेवर धरले.
शिंदे म्हणाले की, परभणी, बीड, कल्याण असो हे राज्य कायद्याचे आहे. इथं न्याय होणारच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सविस्तर उत्तर विधानसभेत दिले. गुन्हेगारांना सोडलं जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. मी मविआ सरकारमध्ये मंत्री होतो. मलाच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा डाव सुरू होता. मविआचा कारभार कसा चालत होता हे अंबादास यांना कल्पना आहे पण त्यांना बोलता येत नाही. सध्या अंबादास तुम लढो मै खोके लेके घर जाता हूँ असा कारभार आहे.
विधानसभेत मिळालेलं यश हे अनपेक्षित, आम्हालाही वाटलं नव्हते. ईव्हीएम घोटाळा नाही तर जनतेने दाखवलेला हा विश्वास आहे. विरोधकांनी खोटेनाटे आरोप न करता जनतेचे प्रश्न सभागृहात मांडाल ही अपेक्षा होती. सभागृहात कमी परंतु माध्यमांसमोर बोलण्यात विरोधकांनी धन्यता मांडली. आरोपाला आरोपाने नव्हे कामातून उत्तर देऊ. निवडणुकीच्या निकालावरून हे स्पष्ट झाले घरी जनतेला काम करणारे लोक आवडतात. घरी बसणाऱ्यांना घरी बसवतात असेही शिंदे म्हणाले.