नागपूर: २३ डिसेंबर २०२४ रोजी, गुन्हेशाखा युनिट क्र. ५ ने नायलॉन मांजा बाळगणाऱ्या एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, विनायक शाळेजवळ दुध डेअरी चौकात घडला. यावेळी पोलीसांनी खात्रीशीर माहितीवर आधारित कारवाई केली आणि संशयित चेतन मनोज नागपूरे (वय १९) याच्या जवळून २६ बंडल नायलॉन मांजा जप्त केला.
आरोपीवर पर्यावरण संरक्षण अधिनियम, १९८६ अंतर्गत कारवाई केली असून त्याच्या ताब्यातून एकूण ५२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तसेच, २३ डिसेंबर २०२४ रोजीच, पोलीस ठाणे कोराडी हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दुसऱ्या आरोपी आदेश उर्फ आदया दुर्गादास तिरपूडे (वय २४) याला ताब्यात घेतले. आरोपी हद्दपार करण्याच्या आदेशाच्या उल्लंघनासाठी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह. पोलीस आयुक्त निसार तांबोळी आणि अपर पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध पुढील कारवाई सुरू आहे.