नागपूर : बुटीबोरी येथील वर्धा रोडवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाला तडा गेला आहे. त्यामुळे पोलिसांनी सावधगिरी बाळगून उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक बंद केली आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाने (एनएचएआय) एका खासगी कंत्राटदाराकडून त्याचे बांधकाम करून घेतले होते.
नागपुरातील बुटीबोरी येथे महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही वर्षांपूर्वी एनएचएआयने उड्डाणपूल बांधला होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या खांबांमध्ये काही तांत्रिक त्रुटी आढळून आल्यानंतर तेथून वाहतूक बंद करण्यात आली आहे.
उड्डाणपुलाच्या दोन मोठ्या खांबांमधील भागाला आधार देणाऱ्या आठ लहान खांबांमध्येच दोष आढळून आला. हे खांब खालच्या बाजूस झुकले होते, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून तपासणी केली.
हा उड्डाणपूल बंद झाल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना त्रास होत असला तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे आवश्यक पाऊल असल्याचे बोलले जात आहे. उड्डाणपुलाची दुरुस्ती झाल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू केली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.