नागपूर : नागपूरकरांनी नविन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. तत्पूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ट्रॅफिक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केल्याचे समोर आले आहे.
सोमवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते बुधवार, 1 जानेवारी रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी शहरातील 10 वाहतूक झोनमध्ये कडक कारवाई केली. या कालावधीत ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 161 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, तर वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 11,463 वाहनचालकांविरुद्ध चालान फाडण्यात आले. सक्करदरा ट्रॅफिक झोनमध्ये सर्वाधिक मद्यधुंद वाहनचालक पकडले गेले.
येथे 26 ड्रिंक अँड ड्राईव्हचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच वेळी, वाहतूक नियमांचे सर्वाधिक उल्लंघन सोनेगाव ट्रॅफिक झोनमध्ये झाले, जेथे 1,407 लोकांना चलन बजावण्यात आले. लकडगंज झोन दंडाच्या बाबतीत आघाडीवर होता.या झोनमधून 12.82 लाख रुपये वसूल करण्यात आले.
दरम्यान पोलिसांच्या या काटेकोरपणामागे रस्ते अपघात रोखणे आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहणे हा उद्देश असल्याचे वाहतूक पोलिस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मात्र, नियमांचे पालन करण्याची सवय अद्याप नागरिकांमध्ये रुजलेली नसल्याचेही या आकडेवारीवरून स्पष्ट दिसत आहे.
झोननिहाय कारवाईची आकडेवारी –
• लकडगंज: रु. 12.82 लाख (14 ड्रिंक अँड ड्राईव्ह, 1,359 चालान)
• सोनेगाव: रु. 12.35 लाख (12 ड्रिंक अँड ड्राईव्ह, 1,407 चालान)
• सीताबर्डी: रु. 12.44 लाख (7 ड्रिंक अँड ड्राईव्ह, 1,336 चालान)
• सक्करदरा: रु 10.63 लाख (26 ड्रिंक अँड ड्राईव्ह, 1,119 चालान)
• सर्व प्रकरणात एकूण वसुली: 1,07,07,701 रुपये