नागपूर : मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर सीताबर्डी मेन रोड वरील पथविक्रेत्यांच्या अनुषंगाने सुरु असलेल्या न्यायीक प्रकरणात मनपातर्फे बाजू ठेवणेकरीता परवानाधारक पथ विक्रेत्यांकरिता पर्यायी जागा शोधण्याकरिता मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी सीताबर्डी बाजारपेठ लगतच्या जागेची सोमवारी (ता. ६) पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री अजय चारठाणकर, उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, श्री प्रकाश वराडे, सहायक आयुक्त श्री हरीश राऊत, स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पंकज पराशर उपस्थित होते.
सीताबर्डीमध्ये रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या पथविक्रेते सध्या आपला व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीला त्रास होत असतो. या बाजारपेठेतील दुकानदारांनी या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महानगरपालिकेला १०३ परवाना धारक पथविक्रेत्यांसाठी पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश दिले.
या निर्देशाच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी योग्य पर्यायी जागा शोधण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले. आयुक्तांनी जवळपास असलेल्या अधिकृत हॉकर्स झोनची सुद्धा पाहणी केली. गैर परवानाधारक पथ विक्रेत्यांना सीताबर्डी बाजारपेठेतून हटविण्याचे निर्देश यावेळी मनपा आयुक्तांनी दिले.
याप्रसंगी अतिक्रमण विभागाचे श्री संजय कांबळे, श्री मनोहर राठोड, श्री दीनदयाल टेंभेकर आदी उपस्थित होते.