भंडारा:पचारा गावातील तीन पुलिया परिसरात वाघाची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भंडारा पोलीस अधीक्षक मा. श्री. नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ कारवाई करून या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, पचारा गावात अज्ञात व्यक्तींनी वाघाची शिकार करून त्याचे अवशेष फेकल्याचे आढळून आले. या माहितीच्या आधारे, उपविभागीय पोलीस अधिकारी (तुमसर) श्री. पी. बी. गोफणे व तुमसर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक श्री. मिलींद तायडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास सुरू केला. पोलीस हवालदार जयसिंग लिल्हारे, डिंगंबर पिपरेवार व वनविभागाच्या श्वान पथकाने तपासामध्ये सहकार्य केले.
तपासादरम्यान संशयित राजू पिरतराम वरखडे (वय 50 वर्षे) याच्या घरी छापा टाकण्यात आला. तेथे संशयास्पद हत्यारे आढळून आली. चौकशी दरम्यान वरखडेने वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. त्याने आपल्या साथीदार दुर्गेश तुरशीदास लसुंते (वय 50) व राजेंद्र ऊर्फ बस्तीराम महादेव कुंजाम (वय 55) यांच्या मदतीने विद्युत शॉकचा वापर करून वाघ ठार केल्याचे सांगितले.
सर्व आरोपींना अटक करून त्यांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
ही महत्त्वाची कारवाई पोलीस अधीक्षक मा. नूरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पी. बी. गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मिलींद तायडे व त्यांच्या पथकाने केली. या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे वाघाच्या शिकारीसारख्या गंभीर गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.