नागपूर : शहरात तोतया पोलिसांचे थैमान सुरु झाले असून यांच्याकडून नागरिकांना लुटले जात आहे. नुकतीच अशाच प्रकारची घटना अजनी पोलीस स्टेशनसमोर घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी पोलिसांचा पोशाख धारण केला होता. आपण पोलीस असल्याचे भासवत त्या दोघांनी या दाम्पत्याला अडवले व सोन्याचे दागिने चलाखीने लंपास केले.
माहितीनुसार, विजय केशवराव महाबुदे (६७, महावीर वॉर्ड, हिंगणघाट) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते शासकीय सेवेतून अधिकारी पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. ७ जानेवारीला ते आयुर्वेदिक औषधी आणण्यासाठी पत्नीसह बजाजनगरला गेले होते. त्यानंतर पावणेबारा वाजताच्या सुमारास ते मानेवाडा येथे राहणाऱ्या नातेवाइकाकडे जायला निघाले.
वंजारीनगर पाण्याच्या टाकीपासून अजनी पोलीस ठाण्याकडे जात असताना पोलिसांच्या वेशात असलेल्या दोन तरुणांनी त्यांना थांबविले. तसेच पोलीस विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवून त्यांनी या दाम्पत्याला विश्वासात घेतले. शहरात चोरीच्या घटना घडत असून तुमचे सोन्याचे दागिने काढून बागेत ठेवा असे त्या तोतया पोलिसांनी महाबुदे यांना सांगितले.
महाबुदे यांनी अंगठी, सोनसाखळी व पत्नीच्या गळ्यातील हार खिशात काढून ठेवली. मात्र, आरोपींनी दागिने खिशात ठेवू नका, आम्ही कागदात बांधून देतो असे म्हटले. त्यानंतर आरोपींनी एका कागदात दागिने बांधून दिले. त्याचवेळी आणखी दोन जण मोटारसायकलवर आले व त्यांनादेखील आरोपींनी थांबविले. त्यांनादेखील हातातील अंगठ्या काढायला लावल्या. त्यानंतर आरोपी निघून गेले.
काही अंतरावर गेल्यावर महाबुदे यांना शंका आली. त्यांच्या सांगण्यावरून महाबुदे यांच्या पत्नीने कागद उघडला असता त्यात लहान दगड होते. आरोपींनी चलाखीने १.०५ लाखांचे दागिने लंपास केले. महाबुदे यांच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तोतया पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.