नागपूर : येत्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षा होणार आहेत. यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. यंदा दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रांवर प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश शिक्षण मंडळाकडून काढण्यात आले आहेत.
राज्यात होऊ घातलेल्या दहावी तसेच बारावीच्या परीक्षेदरम्यान प्रत्येक परीक्षा केंद्रावरील प्रत्येक वर्गखोलीमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे आदेश मंडळाने काढले आहेत. इतकंच नाही तर वीजपुरवठा खंडित झाल्यास सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडू नये यासाठी इन्वर्टर किंवा जनरेटरची व्यवस्था करावी लागणार आहे. सीसीटीव्ही मध्ये चित्रीत झालेले चित्रीकरण विशिष्ट कालावधीसाठी जपून ठेवावं लागणार आहे.
आदेशाच्या अंमलबजावणीबाबत शाळांचे मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुखांकडून हमीपत्र घेण्यात येत आहे.कॉपीमुक्त तसेच भयमुक्त परीक्षेसाठी शिक्षण मंडळाने हे पाऊल उचलले आहे.
दरम्यान राज्यामध्ये दहावीची सुमारे 5000 तर बारावीची सुमारे 3000 परीक्षा केंद्र आहेत. प्रत्येक केंद्रावर किमान 10 सीसीटीव्ही बसवावे लागणार आहेत. एका सीसीटीव्हीसाठी साधारणपणे 20 ते 22 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सीसीटीव्ही यंत्रणेवर लाखो रुपये खर्च करावे लागणार आहेत. शिक्षण मंडळाचा निर्णय योग्य आहे मात्र सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी आवश्यक निधी शिक्षण मंडळाने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शाळांकडून होत आहे.