नागपूर. मागील सहा वर्षापासून यशस्वीरित्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होत आहे. आज महोत्सवाच्या सातव्या पर्वाला सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. नागपूर, विदर्भ आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात खासदार क्रीडा महोत्सव एक उत्तम उदाहरण ठरले आहे. या महोत्सवाच्या यशाचे खरे श्रेय हे दरवर्षी खासदार क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन मनलावून खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे आहे. शहरातील खेळाडू हेच खासदार क्रीडा महोत्सवाच्या यशाचे शिलेदार आहेत, असे प्रतिपादन खासदार क्रीडा महोत्सवाचे प्रेरक केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केले.
सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे रविवारी (ता.१२) सकाळी यशवंत स्टेडियम येथे थाटात उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणौत यांची उपस्थिती होती. मंचावर श्री. निखील गडकरी, आंतरराष्ट्रीय ॲथलिट देव चौधरी, श्री. सुधीर दिवे उपस्थित होते.
पुढे बोलताना केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी म्हणाले, नागपूर शहराचा खासदार म्हणून मागील दहा वर्षात शहरात एक लाख कोटींची कामे केली. शहराचा भौतिक विकास साधतानाच सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात शहर मागे राहू नये यासाठी खासदार सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाची सुरुवात केली. खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून शहरातील खेळाडूंना एक व्यासपीठ मिळत असल्याचे समाधान आहे. आपल्या शहरातील खेळाडू या महोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळवित आहेत, ही अभिमानाची बाब आहे. मागील वर्षीच्या मागणीनुसार या वर्षी अनेक खेळांचे विदर्भ स्तरीय आयोजन केले जात आहे. पुढील काळात जास्तीत जास्त भागातील खेळाडूंना सहभागी होता येईल, यादृष्टीने खेळांचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी २० दिवस शहरातील ७३ क्रीडांगणांवर ५८ खेळ खेळले जातील. यात विविध ५८ खेळांच्या तब्बल २९०० चमू, ६००० ऑफिसियल्स, ८० हजार खेळाडूंचा समावेश असेल. एकूण १३१०० स्पर्धा खेळविण्यात येणार असून यात खेळाडूंना १२३१७ मेडल्स आणि ७६२ ट्रॉफी देण्यात येतील. स्पर्धेतील विजेत्यांना १ कोटी ५० लक्ष रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात येणार आहेत. या सर्व खेळांचा आनंद घेण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी मैदानांमध्ये यावे, असे आवाहन देखील केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांनी केले.
खासदार क्रीडा महोत्सव इतर शहरांसाठी प्रेरणादायी : कंगना रणौत
नागपूर शहरामध्ये सुरु असलेले खासदार क्रीडा महोत्सव हा इतर शहरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत कंगना रणौत यांनी यावेळी व्यक्त केले. मोठ्या शहरांप्रमाणे छोट्या छोट्या गावांमध्येही असे महोत्सव आयोजित व्हावेत, ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिक खेळाप्रती सचेत होतील. आज फिटनेसची प्रत्येकालाच काळजी होत आहे. अशा स्थितीत असे महोत्सव हे इतरांना खेळाप्रती प्रेरीत करतील, असेही त्या म्हणाल्या. यावेळी कंगना रणौत यांनी खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाची घोषणा केली. त्यापूर्वी त्यांनी सर्व खेळाडूंना क्रीडा शपथ दिली.
योगा आणि लेझीमची थरारक प्रात्यक्षिक
खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात सुमारे १० हजारावर खेळाडूंची उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यामध्ये अमित योगा ग्रुपद्वारे रामायणाच्या संकल्पनेवर आधारीत संगीमय योग प्रस्तुती सादर करण्यात आली. केशव नगर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनचरित्र दर्शविणारे लेझीम सादरीकरण केले.
आंतरराष्ट्रीय ॲथलिट देव चौधरी यांनी खासदार क्रीडा महोत्सवाचे ध्वजारोहण केले. ॲथलिट नेहा ढबाले व प्राची गोडबोले या महोत्सवाची मशाल प्रज्वलित केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खासदार क्रीडा महोत्सवाचे सचिव डॉ. पीयूष आंबूलकर यांनी केले. डॉ. आंबूलकर यांनी महोत्सवाचा आजवरचा प्रवास, यश आणि बदलते स्वरुप यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचालन आरजे आमोद यांनी केले. आभार डॉ. पद्माकर चारमोडे यांनी मानले.
यावेळी श्री. नागेश सहारे, डॉ. संभाजी भोसले, डॉ. विवेक अवसरे, सचिन देशमुख, अशफाक शेख, अमित संपत, सतिश वडे, सचिन माथने, सुनील मानेकर, लक्ष्मीकांत किरपाने, डॉ. सौरभ मोहोड, रमेश भंडारी, प्रकाश चांद्रायण आदी उपस्थित होते.
मॅरेथॉनमध्ये राजन यादव, प्राजक्ता गोडबोले प्रथम
खासदार क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभापूर्वी झालेल्या मॅरेथॉनमध्ये पुरुष गटात राजन यादव व महिला गटात प्राजक्ता गोडबोले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. पुरुष गटात पीडब्ल्यूएस महाविद्यालयाच्या राजन यादवने २३.२४ मिनिटात १० किमी अंतर पूर्ण केले. एस.बी. सिटी महाविद्यालयाचा सौरव तिवारी २३.२५ मिनिटासह दुसरा ठरला तर आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेजचा प्रणय माहुले (२३.४९ मि.) तिसरा आला.
महिलांमध्ये मावडे क्लबच्या प्राजक्ता गोडबोले ने १८.४४ मिनिटांमध्ये ५ किमी अंतर पूर्ण करुन पहिले स्थान पटकाविले. १९ मिनिटात ५ किमी शर्यत पूर्ण करुन मावडे क्लबची रिया दोहात्रे दुसरी आणि तेजस्विनी लामकाने १९.४२ मिनिटासह तिसरी आली.
१६ वर्षाखालील गटात अकोला येथील अभय इंगळेने १८.२५ मिनिटात ५ किमी अंतर पूर्ण करुन प्रथम स्थान पटकाविले. आदित्य नागेश्वर (१८.४२ मि.) दुसरा व कपील हटकर (१९.०१ मि.) तिसरा आला. मुलींमध्ये जानवी बावणे (१२.३३ मि) हिने प्रथम, ईश्वरी काळमेघे (१२.३५ मि.) हिने द्वितीय आणि हिमांशी बावणे (१२.४२ मि.) हिने तिसरे स्थान प्राप्त केले.
सर्व विजेत्यांना केंद्रीय मंत्री श्री.नितीन गडकरी, खासदार, सिने अभिनेत्री कंगना रणौत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
३ किमीच्या युवा दौडमध्ये ८३ वर्षीय श्रीबध भुरडे आणि ७९ वर्षीय डॉ. देवकरराव भोयर हे सर्वात ज्येष्ठ ॲथलिट ठरले तर ४ वर्षीय सौरभ कुरमेळकर आणि अयांश करारे हे दोघे सर्वात तरुण ॲथलिट ठरले.
निकाल (प्रथम, द्वितीय व तृतीय)
पुरुष – १० किमी
राजन यादव (पीडब्ल्यूएस महाविद्यालय) २९.५२ मि., सौरव तिवारी (एस.बी. सिटी महाविद्यालय) २९.५७ मि., प्रणय माहुले (आर्ट्स अँड कॉमर्स नाईट कॉलेज) ३०.०९ मि.
महिला – ५ किमी
प्राजक्ता गोडबोले (मावडे क्लब) १८.४४ मि., रिया दोहात्रे (मावडे क्लब) १९.०० मि., तेजस्विनी लामकाने (नाम्या फाउंडेशन) १९.४२ मि.
१६ वर्षाखालील मुले – ५ किमी
अभय इंगळे (भारत विद्यालय अकोला) १८.२५ मि., आदित्य नागेश्वर (ट्रॅक स्टार) १८.४२ मि., कपील हटकर (वसंतराव नाईक विद्यालय) १९.०१ मि.
१६ वर्षाखालील मुली
जानवी बावणे (ट्रॅक स्टार) १२.३३ मि., ईश्वरी काळमेघे (वर्धा) १२.३५ मि., हिमांशी बावणे (ट्रॅक स्टार) १२.४२ मि.
युवा दौड – ३ किमी
सर्वात ज्येष्ठ ॲथलिट – श्रीबध भुरडे (८३ वर्षे), डॉ. देवकरराव भोयर (७९ वर्षे)
सर्वात तरुण ॲथलिट – सौरभ कुरमेळकर (४ वर्षे), अयांश करारे (४ वर्षे)