नागपूर : मकर संक्रांतीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रात १४ जानेवारीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी तिळगुळाचे लाडू बनवले जातात आणि एकमेकांना “तिळगुळ घ्या, गोड गोड बोला” असे म्हणत शुभेच्छा दिल्या जातात. संक्रांतीचा सण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आनंदाने साजरा करतात.यादिवशी पतंग उडवण्याची उत्सुकता विशेष पाहायला मिळते. टेरेसवर लावलेल्या हिंदी-मराठी गाण्यांचा ताल, भान हरपून चाललेल्या पतंगबाजीसह जल्लोषात नागपूरकर हा उत्सव साजरा करत आहेत. दिवसभर शहरातील प्रत्येक इमारतीच्या गच्ची व घरांच्या धाब्यांवर पतंगप्रेमींचा जल्लोष सुरू असणार आहे.
पतंगांची अवकाशात गवसणी घालतानाच काटाकाटीचा खेळही रंगल्याचे पाहायला मिळाले. दोर कापल्यानंतर ‘ओ पार’ ‘ओ काट’च्या गजराने आसमंत दुमदुमून गेल्याचे पाहायला मिळाले.
नागपुरात नायलॉन मांजावर बंदी –
मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर पतंगांचा खेळ रंगू लागला. मात्र, आता हा खेळ पूर्वीसारखा राहिलेला नाही. यात आता नायलॉन मांजाचा शिरकाव झाल्याने हे खेळ निष्पाप लोकांसाठी जीवघेणा झाला आहे.यासाठी नागपूर पोलीस विभाग आणि महानगर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर आले आहे.