नागपूर – शतकपूर्तीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या महाल येथील मातृसेवा संघामध्ये आता नेत्र व दंतरोगांशी संबंधित उपचार देखील होणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता सौ. सीमा नुवाल तसेच मातृसेवा संघाच्या अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते या दोन्ही विभागांचे बुधवार दि. १५ जानेवारीला उद्घाटन झाले.
९७ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या महाल येथील मातृसेवा संघाच्या वैशिष्ट्यांमध्ये आता आणखी भर पडली आहे. विविध महत्त्वपूर्ण विभागांसह नेत्र व दंत रोग विभागांमुळे रुग्णांची सोय होणार आहे. हे दोन्ही विभाग आता रुग्णांच्या सेवेत दाखल झाले आहेत. यावेळी संस्थेच्या सचिव रश्मी फडणवीस आणि कोषाध्यक्ष इरावती दाणी यांचीही उपस्थिती होती.
प्रसूती तसेच स्त्रीरोगावरील उपचाराच्या संदर्भात गेल्या ९७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका संस्थेशी जुळता आले याबद्दस सौ. सीमा नुवाल यांनी समाधान व्यक्त केले. या विभागांचा समाजातील प्रत्येक वर्गातील रुग्णांना लाभ होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सौ. कांचनताई गडकरी यांनी मातृसेवा संघाच्या समृद्ध प्रवासावर प्रकाश टाकला. मातृसेवा संघाने लोकाभिमूख दृष्टिकोन ठेवून रुग्णसेवा केलेली आहे. महिलांना प्रसूतीपूर्व तसेच प्रसूतीनंतर देखील मार्गदर्शन करून प्रत्येक रुग्णाला मातृसेवा संघ आपल्या कुटुंबाचा भाग करून घेत असते. नेत्र व दंतरोग विभागांमुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत रुग्णसेवा पोहोचविण्याचा उद्देश पूर्ण होणार आहे, असा विश्वासही सौ. कांचनताई गडकरी यांनी व्यक्त केला. मातृसेवा संघाच्या वैद्यकीय संचालक डॉ. छाया चौरसिया यांनी संस्थेच्या इतिहासावर प्रकाश टाकला.
यावेळी दंत रोग विभागाच्या डॉ. नुपूर भावसार-विभुते व डॉ. प्रियंका हिंगवे-काटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. बी.पी. खोब्रागडे, बालरोग शस्त्रक्रिया विभागाचे डॉ. राजेंद्र सावजी, पॅथॉलॉजी विभागाच्या डॉ. प्रेमा मुरारका, फिजिशियन विभागाचे डॉ. राहुल चौबे, फिजिओथेरेपी विभागाच्या डॉ. लुबियाना अली, नर्सिंग विभागाच्या क्लायरा पटला यांची उपस्थिती होती. सर्वांनी आपापल्या विभागांचे वैशिष्ट्य तसेच उपचारांची माहिती दिली.
नेत्ररोग विभागातील सेवा
नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. राहुल बाहेती यांनी उपचारांच्या संदर्भात माहिती दिली. आधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची तपासणी, मोतिबिंदूची तपासणी आणि शस्त्रक्रिया, लेझर मशीनद्वारे डोळ्यांची शस्त्रक्रिया, काचबिंदू, रेटिना (पडदा) यांची तपासणी व उपचार मातृसेवा संघामध्ये उपलब्ध झाले आहे.
दंतरोग विभागातील सेवा
डॉ. नुपूर भावसार-विभुते व डॉ. प्रियंका हिंगवे-काटे यांनी दंत चिकित्सा विभागातील उपचारांची माहिती दिली. कॅविटी रुट कॅनल, कॅप आणि ब्रिज बसवणे, कवळी बसवणे, टुथ रिप्लेसमेंट, हिरड्यांचे उपचार, दातांच्या एक्स-रेसह दातांची स्वच्छता, कॉस्मेटिक सर्जरी यासह वाकड्या झालेल्या दातांना व्यवस्थित करणे आदी सेवा दंतरोग विभागात उपलब्ध आहेत.
स्त्री-पुरुष दोघांनाही मिळतोय उपचाराचा लाभ
मातृसेवा संघामध्ये स्त्रीरोग विभाग, प्रसूती विभाग पूर्णपणे महिलांसाठी समर्पित आहेत. मात्र त्याचवेळी बालरोग विभाग, बालरोग शस्त्रक्रिया विभाग, पॅथॉलॉजी, फिजिओथेरेपी हे विभाग बालरुग्णांसाठी तसेच स्त्री आणि पुरुष रुग्णांसाठी आधीपासून कार्यरत आहेत. आता यामध्ये दंत व नेत्र रोग विभागाचीही भर पडली आहे. कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरुष रुग्णांवर याठिकाणी उपचार व पॅथॉलॉजी टेस्ट होत आहेत, हे विशेष.