नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लॉन टेनिस स्पर्धेमध्ये वायूसेनेचे सुनील कुमार ‘चॅम्पियन’ ठरले. पुरुष एकेरीमध्ये सुनील कुमार यांनी अचिंत्य वर्मा यांचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करुन जेतेपद पटकाविले.
रामनगर टेनिस कोर्टवर ही स्पर्धा पार पडली. स्पर्धेमध्ये नागपूर शहर आणि जिल्हा, हिंगणघाट, अमरावती, पुलगाव, वर्धा, यवतमाळ यासह संपूर्ण विदर्भातील ४९२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. 10 वर्षाखालील, 12 वर्षाखालील, 14 वर्षाखालील, 16 वर्षाखालील, पुरुष एकेरी आणि पुरुष दुहेरी अशा सहा गटात ही स्पर्धा घेण्यात आली.
पुरुष दुहेरीमध्ये तेजल पाल आणि सेजल भूतडा या जोडीने विजेतेपदाचे चषक उंचावले. तेजल व सेजल यांनी चुरशीच्या लढतीत टायब्रेकरमध्ये राज बगडै व अचिंत्य वर्मा या जोडीचा 6-1, 4-6, 10-6 ने पराभव केला.
स्पर्धेतील विजेत्यांना डॉ. परिणिता फुके, प्रगती पाटील, विशाल लोखंडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी नागपूर जिल्हा हार्डकोअर टेनिस असोसिएशनचे कुमार काळे, अशोक भिवापुरकर, डॉ. सुधीर भिवापुरकर, विक्रम नायडू, विजय नायडू, स्पर्धेचे पंच संदीप नन्नावरे, विशाल लांडगे उपस्थति होते.
अंतिम फेरी निकाल
10 वर्षाखालील मुले : तिआन ठक्कर मात कबीर पंचमतिया
10 वर्षाखालील मुली: तिआना ठक्कर मात दिहा सहारे
12 वर्षाखालील मुले: विहान तवानी मात अगस्तय सिंघानिया
12 वर्षाखालील मुली: इन्सिया कमाल मात निवांशी देवकाटे
14 वर्षाखालील मुले: प्रणव गायकवाड मात अंश पटेल
14 वर्षाखालील मुली: सुरमयी सताहे मात शर्वरी श्रीरामे
16 वर्षाखालील मुले: शिवराज भोसले मात अक्षत दक्षिणदास
16 वर्षाखालील मुली: मिष्का तायडे मात सुरमयी साठे