नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील टेबल टेनिस स्पर्धेच्या अंतिम लढतीत जयेश कुलकर्णी आणि ज्ञानेश्वरी पाथरकर यांनी प्रतिस्पर्धींना नमवून पुरुष व महिला गटातील विजेतेपद पटकाविले. महाल येथील रामजीवन चौधरी सभागृहामध्ये ही स्पर्धा पार पडली.
पुरुष गटातील अंतिम लढत जयेश कुलकर्णी विरुद्ध वैभव राणे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत पहिल्या सेटमध्ये जयेश कुलकर्णी ने आघाडी घेतली. मात्र दुसऱ्या सेटमध्ये वैभव राणे ने बरोबरी साधली. दोन सेट आघाडी बरोबरीत गेल्यानंतर अखेर तिसऱ्या निर्णायक सेटमध्ये जयेश कुलकर्णीने सामन्यात विजय संपादित केला. हा सामना जयेश कुलकर्णीने ११-८, ५-११, ११-४, ७-११, ११-५ ने जिंकून विजेतेपद प्राप्त केले.
महिलांच्या अंतिम फेरीत ज्ञानेश्वरी पाथरकर विरुद्ध हर्षाली देवगडे यांच्यात लढत झाली. सामन्यात ज्ञानेश्वरी पाथरकरने हर्षाली देवगडेचा ११-१, ११-८, ११-४ असा तीन सेटमध्ये पराभव करुन विजेतेपदावर मोहोर उमटविली.
यापूर्वीच्या उपांत्य फेरीत पुरुष गटात जयेश कुलकर्णी ने लावण्य धकाते ला मात देऊन अंतिम फेरीत प्रवेश केला होता. दुसऱ्या उपांत्य लढतीत वैभव राणे ने कौस्तुभ उदार ला नमवून जयेश कुलकर्णीचे अंतिम फेरीतील आव्हान स्वीकारले. महिला गटात ज्ञानेश्वरी पाथरकरने लावण्या गिरनारे चा व हर्षाली देवगडे ने वेणुश्री शर्माचा पराभव करुन अंतिम फेरीत प्रवेश केला होता.