नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुले व मुलींमध्ये मराठा लॉन्सर्स महाल, मराठा लॉन्सर्स धरमपेठ, विक्रांत स्पोर्टींग नागपूर, मराठा लॉन्सर्स काटोल, साई स्पोर्टिंग काटोल, केसरी क्रीडा मंडळ कळमेश्वर, रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. विभागीय क्रीडा संकुल मानकापूरच्या इनडोअर स्टेडियममध्ये २१ जानेवारी रोजी स्पर्धेचे उपांत्य फेरीतील सामने होतील.
उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात मराठा लॉन्सर्स महाल संघाने न्यू ताज क्रीडा मंडळ नागपूर संघाचा ३६-१० ने, मराठा लॉन्सर्स धरमपेठ संघाने नागसेन क्रीडा मंडळ कामठी संघाचा ३०-१६ ने, विक्रांत स्पोर्टिंग नागपूर संघाने रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड संघाचा ३७-२७ ने आणि मराठा लॉन्सर्स काटोल संघाने एकता क्रीडा मंडळ पारडी संघाचा ४८-१४ ने पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत मराठा लॉन्सर्स महाल विरुद्ध मराठा लॉन्सर्स धरमपेठ आणि विक्रांत स्पोर्टींग नागपूर विरुद्ध मराठा लॉन्सर्स काटोल यांच्यात लढत होईल.
मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीत साई स्पोर्टींग काटोल मात संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर संघाचा ४५-२९ ने, केसरी क्रीडा मंडळ कळमेश्वर संघाने मराठा लॉन्सर्स महाल संघाचा ४१-३० ने, विक्रांत स्पोर्टिंग नागपूर संघाने श्री. गजानन चक्रधर नगर नागपूर संघाचा ३६-१३ ने आणि रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड संघाने श्री. साई स्पोर्टिंग नागपूर संघाचा ४०-३४ ने पराभव करुन उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. उपांत्य फेरीत साई स्पोर्टींग काटोल संघाची केसरी क्रीडा मंडळ कळमेश्वर संघासोबत आणि विक्रांत स्पोर्टिंग नागपूर संघाची रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड संघासोबत लढत होईल. दोन्ही वयोगटातील उपांत्य सामने मंगळवारी २१ जानेवारी २०२५ रोजी होतील.