मुंबई : राज्यात नुकतेच महायुतीचे सरकार स्थापन झाले. यानंतर पालकमंत्री पदांची घोषणा कधी होणार आणि कोणत्या नेत्यांना पालकमंत्री पद मिळणार याकरिता महायुतीत रस्सीखेच सुरु होती. काही दिवसांपूर्वी महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या केल्या आहे. यावरून सध्या महायुतीमध्ये वाद पेटल्याची माहिती आहे.. यानंतर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी या संपूर्ण प्रकरणावर टीका केली आहे. एक्स वर केलेल्या एका पोस्टमध्ये आदित्य ठाकरे म्हणाले की, पालकमंत्री पदासाठी हावरटपणा करणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढले पाहिजे. हा हावरटपणा बरा नाही.
पालकमंत्रिपदासाठी टायर जाळले जातात, रास्ता रोको होतो. रस्ते अडवले जाताात. मग ईव्हीएमच्या बहुमतामुळं आलेले सरकार आणि हे सगळं मुख्यमंत्री सहन कसे करताहेत? असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केलाय. मंत्र्यांचा स्वार्थीपणा बरा नाही. भरत गोगावलेंचे नाव न घेता आदित्य ठाकरेंनी भरत गोगावलेंवर पालकमंत्रिपदावरून टीका केलीय. नाशिक, रायगड पालकमंत्रिपदावरून सरकारमध्ये वाद सुरू आहेत. गोंधळ सुरू आहे. यांच्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरून वाद सुरू आहे.
पहिल्यांदा तिकीट वाटप, मंत्रिपद आणि आता पालकमंत्रिपदावरून यांच्यात रस्सीखेच सुरू होती. मग हे लोक जनतेची काम करणार कधी? त्यांना न्याय देणार कधी? अशी टीका आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर केलीय. पालकमंत्रिपदावरून मुख्यमंत्री हतबल आहेत. मुख्यमंत्री एवढे का सहन करताहेत माहीत नाही. स्वार्थापोटी यांच्यात वाद सुरू आहेत. एका एका मंत्र्यांला तीन-तीन जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद दिलंय. त्यांना जिल्ह्याचे मालक व्हायचे आहे. मालकमंत्री व्हायचे आहे, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर केली.