नागपूर : भारतीय नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीकरीता आणि लोकशाहीत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येतो. या वर्षीही मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देशभरात शनिवारी २५ जानेवारी रोजी १५वा “राष्ट्रीय मतदार दिवस” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या दहाही झोनमध्ये १५वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मतदानाची शपथ घेऊन नागरिकांना मतदानासाठी जागरुक करतील.
लोकशाहीत नागरिकांचा मतदानामध्ये सहभाग महत्वाचा असतो. मा. भारतीय निवडणूक आयोग यांच्याकडून मतदानाविषयी जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. जिल्हा स्तरावर आणि महानगरपालिका झोन स्तरावरील मतदान केंद्रात मतदानाच्या दिवशी सातत्याने नागरिकांचा सहभाग वाढत आहे. नागरिकांचा मतदानाप्रति वाढता उत्साह लक्षात घेता, निवडून आयोगाच्या निर्देशानुसार शनिवारी २५ जानेवारी रोजी १५वा “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात येणार आहे.
याकरिता मा. भारत निवडणूक आयोगाकडून यंदाच्या १५ व्या राष्ट्रीय मतदार दिवसासाठी ‘नथींग लाईक व्होटिंग, आय व्होट फॉर शुअर’ ही थीम देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय मतदान दिन कार्यक्रम साजरा करण्याकरिता सर्वसमावेशक प्रचार प्रसाराचा आराखडा, जिल्हास्तरीय आयकॉन व्यक्तींचा समावेश, विविध संस्थेशी भागीदारी व सहयोग, समाज माध्यमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मतदान केंद्र स्तरावर व जिल्हा स्तरावर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा करतांना मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाचे सविस्तर पालन केले जाणार आहे.
मनपाचे प्रशासक तथा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली महानगरपालिका मुख्यालय व झोन स्तरावर राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनी अधिकारी, कर्मचारी यांना मतदानांची शपथ दिली जाणार आहे.