Published On : Tue, Jan 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

अंडरपासमुळे बेसा-बेलतरोडीच्या नागरिकांना दिलासा

केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी; मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमलवाडा-मनीषनगर रेल्वे अंडरपास (आरयुबी)चे उद्घाटन

नागपूर – सोमलवाडा- मनीषनगर रेल्वे अंडरपासमुळे (आरयुबी) वर्धा रोडवर येण्यासाठी आणखी एक कनेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे. यामुळे मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (मंगळवार) येथे व्यक्त केला.

सोमलवाडा-मनीष नगर रेल्वे अंडरपास (आरयुबी)चे उद्घाटन ना. श्री. गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ना. श्री. गडकरी बोलत होते. या कार्यक्रमाला राज्यमंत्री आशीष जयस्वाल, आमदार इंद्रनील नाईल, आमदार कृपाल तुमाने, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, अविनाश ठाकरे, रितेश गावंडे यांची उपस्थिती होती.

Gold Rate
Thursday 06 Feb. 2025
Gold 24 KT 84,900 /-
Gold 22 KT 79,000 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ना. श्री. गडकरी म्हणाले, ‘आपण एक अंडरपास तयार केला होता. पण त्यातून समस्या सुटली नाही. म्हणून दुसऱ्या प्रकल्पाची योजना आखण्यात आली. नवीन अंडरपाससाठी देवेंद्रजींनी जागेची निवड केली आणि महामेट्रोकडे कामाची जबाबदारी सोपविण्यात आली. आता तिसराही उड्डाणपूल महाराष्ट्र सरकारने मंजूर केला आहे. हा उड्डाणपूल थेट हॉटेल रेडिसनजवळ उतरणार आहे. त्यामुळे भविष्यात मनीषनगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांची अधिक सोय होणार आहे.’ याठिकाणी रेल्वेचे फाटक होते. पण १७० रेल्वे धावत असल्यामुळे नागरिकांना त्रास व्हायचा. आता नवीन अंडरपासमुळे हा त्रास दूर झाला आहे, असेही ना. श्री. गडकरी म्हणाले.

पावसाळ्यात पाणी साचणार नाही
३३.८३ कोटी रुपयांचा हा प्रकल्प मनीष नगर, बेसा, बेलतरोडी येथील नागरिकांसाठी अत्यंत सोयीचा ठरला आहे. पावसाळ्यात पाणी साचायला नको यासाठी उच्चक्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत. १९० मीटरच्या या अंडरपासमध्ये पादचाऱ्यांसाठी देखील फुटपाथची सोय करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मानले ना. श्री. गडकरी यांचे आभार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नितीनजी गडकरी यांच्यामुळे उत्तम अशा अंडरपासची निर्मिती झाली आहे. मनीष नगर येथे कनेक्टिव्हिटीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून होता. त्यासाठी उड्डाणपूल तयार केला. पण तरीही दुसरी व्यवस्था करण्याची गरज होती. हे काम अत्यंत आव्हानात्मक होते. पण नितीनजींच्या मार्गदर्शनात उत्तम असे काम झाले आहे. दक्षिण-पश्चिम नागपूरच्या जनतेच्या वतीने नितीन गडकरी यांचे आभार मानतो.’

Advertisement