मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महायुतीने सत्ता स्थापन केली. लोकसभा निवडणुकीत दिसलेले चित्र विधानसभा निवडणुकीत बदलल्याने महाविकास आघाडीने यावर शंका व्यक्त केली आहे. विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत होता. आज लोकसभा विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे व शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यासह घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांबाबत सविस्तर आकडेवारी सादर करत निवडणूक आयोगासमोर प्रश्न उपस्थित केले आहे.
विधानसभा निवडणूक २०१९ ते लोकसभा निवडणूक २०२४ या पाच वर्षांत ३२ लाख मतदारांचा याद्यांमध्ये नव्याने समावेश करण्यात आला. पण लोकसभा २०२४ ते विधानसभा २०२४ या पाच महिन्यांत ३९ लाख नवे मतदार समाविष्ट झाले. लोकसभा निवडणुकीनंतर पाच महिन्यांत समाविष्ट झालेले मतदार आधीच्या पाच वर्षांतल्या मतदारांपेक्षा जास्त कसे? हे ३९ लाख मतदार कोण आहेत? आख्ख्या हिमाचल प्रदेशमध्ये ३९ लाख मतदार आहेत. आणि तेवढे नवे मतदार महाराष्ट्रात मतदार याद्यांमध्या समाविष्ट झाले असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही महाराष्ट्रातील एकूण नोंदणीकृत मतदार जास्त कसे होतात? सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त मतदार आहेत.
काँग्रेसला लोकसभेत कामठी विधानसभा मतदारसंघात १.३६ लाख मतं मिळाली. विधानसभेत आम्हाला तिथेच १.३४ लाख मतं मिळाली. यात फारसा फरक पडलेला नाही. पण या काळात या मतदारसंघात ३५ हजार नव्या मतदारांचा समावेश झाला आहे. दुसरीकडे भाजपाला लोकसभेत १.९ लाख मतं मिळाली होती. विधानसभेत त्यांना १.७५ लाख मतं मिळाली. यातले बहुतेक मतदार हे त्या नव्याने समाविष्ट झालेल्या ३५ हजार मतदारांमधून आले. हे फक्त एका मतदारसंघातले नाही. तर असे अनेक मतदार संघ आहेत ज्याठिकाणी अशा प्रकारचा घोळ पाहायला मिळाला.
हाराष्ट्रात आमची मतं कमी झालेली नाही तर भाजपाची वाढली आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. आम्ही यासाठी निवडणूक आयोगाला वारंवार विनंती केली आहे. पण त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही. यात काहीतरी काळंबेरं आहे म्हणून ते उत्तर देत नाहीत. मी कोणताही आरोप करत नाही तर मी इथे थेट आकडेवारी दाखवत असल्याचे, राहुल गांधी म्हणाले.