नागपूर : प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहाबादिया यांनी केलेल्या एका विधानावरून सर्व स्तरावरून संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनीही या प्रकरणावर भाष्य करत संताप व्यक्त केला. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये त्याने एका स्पर्धकाशी बोलताना रणवीर अलाहाबादिया याने वादग्रस्त विधान केले. यानंतर सोशल मीडियावर रणवीरला बॉयकॉट करण्याचीही मागणी होत आहे.
आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल विचारला आक्षेपार्ह प्रश्न –
रणवीर अलाबादिया, आशिष चंचलानी व अपूर्व मुखिजा यांनी ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या ताज्या भागात हजेरी लावली. यावेळी रणवीरने एका स्पर्धकाला आई वडिलांच्या प्रायव्हसीबद्दल आक्षेपार्ह प्रश्न विचारला होता. तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचे थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितले.
रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत. या विधानावरून आता वादंग पेटले असून रणवीरवर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस संतापले-
अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह विधानाबद्दल देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही काही मर्यादा आहेत. आपल्या समाजात आपण अश्लीलतेचे काही नियम तयार केले आहेत, ते नियम जर कोणी ओलांडत असेल तर ते खूप चुकीचं आहे. असे काही घडत असेल तर त्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, असे विधान फडणवीस यांनी केले.