Published On : Wed, Feb 19th, 2025
By Nagpur Today Nagpur News

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा नव्या पिढीसाठी दिशादर्शक : ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे

जय छत्रपती शिवाजी महाराज, जय भारत पदयात्रेचे दिमाखदार आयोजन

नागपूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जाज्वल्य इतिहास हा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या कार्याची महती लहान थोरांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक आहे. ही प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ हा उत्तम आणि महत्वाकांक्षी उपक्रम आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिमाखात साजरी करण्यात आली. केंद्र व राज्य शासनाकडून प्राप्त निर्देशांच्या अनुषंगाने शहरात बुधवार १९ फेब्रुवारी रोजी राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा ते गांधी गेट महाल पर्यंत ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत’ पदयात्रा काढण्यात आली. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची पदयात्रेला विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार श्री. प्रवीण दटके, आमदार श्री. आशिष देशमुख, श्रीमंत राजे मुधोजी भोसले, माजी आमदार श्री. विकास कुंभारे, विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, आदिवासी विभाग अप्पर आयुक्त रवींद्र ठाकरे, मनपा अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनायक महामुनी, पोलिस उपायुक्त महेक स्वामी, अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य श्री. समय बन्सोड, मनपा उपायुक्त श्रीमती विजया बनकर, उपायुक्त श्री. विजय देशमुख, श्री. मिलींद मेश्राम, डॉ. रंजना लाडे, परिवहन व्यवस्थापक श्री. विनोद जाधव, सहायक आयुक्त समाजकल्याण विभाग श्रीमती सुकेशनी तेलगोटे, मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, मनपा क्रीडा व सांस्कृतिक अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर, एनसीसीचे कर्नल गौतम कपूर, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

Gold Rate
Saturday 22 Feb. 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सक्करदरा येथे राजे रघुजी भोसले यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करुन पदयात्रेला सुरुवात झाली. तर महाल येथील गांधी गेट स्थित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले व पदयात्रेची सांगता झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला संबोधित केले. छत्रपती शिवाजी महाराजांची महती देशभर पोहोचावी आणि विकसीत भारताची संकल्पना अधिक मजबूत याकरिता मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ‘जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रा’ उपक्रमाची रचना केली. आज देशभर हा कार्यक्रम साजरा होत असल्याबाबत ना.श्री.बावनकुळे यांनी आनंद व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्कृष्ट शासक, प्रशासक होते. जनतेच्या हिताचाच सदैव विचार मनात बाळगून कार्य करणाऱ्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा अंगीकृत करुन महाराष्ट्र आणखी प्रगतीपथावर जाईल, असा विश्वासही ना.श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. जनतेने उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदविल्याबद्दल त्यांनी जनतेचेही आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला. मुघलशाहीचे पतन आणि हिंदवी स्वराज्याची बळकटी साधणारा हा सुवर्णक्षण ठरला. महाराजांची ही वाघनखं महाराष्ट्र शासनाने लंडनहून परत आणली. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने महाराजांची ही ऐतिहासिक वाघनखं नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेली आहेत. या वाघनखांचे नागरिकांनी दर्शन घ्यावे, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केले.

कार्यक्रमात मनपाचे अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी स्वत: रेखाटलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्र मा. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना भेट दिले. कार्यक्रमाचे संचालन मनपा जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व हंबीरराव मोहिते यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी डॉ. पीयूष आंबुलकर यांनी मानले.

शिवकालीन कलांचे नेत्रदिपक सादरीकरण

गांधीगेट येथील कार्यक्रमात श्री. अमोल खंते यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वेशभूषा साकारुन उपस्थिती दर्शविली होती. शहरातून काढण्यात आलेल्या जय छत्रपती शिवाजी महाराज जय भारत पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी चिमुकल्यांनी शिवकालीन कलांचे सादरीकरण केले. या सादरीकरणाला पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाळ्या वाजवून दाद दिली आणि चिमुकल्यांना प्रोत्साहित केले. राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा येथे संजूबा हायस्कूलचा विद्यार्थी अजित मोहिते शिवाजी महाराजांवर उत्कृष्ट पोवाडा सादर केले. पदयात्रेला सुरुवात होण्यापूर्वी या ठिकाणी डॉ. संभाजी भोसले ग्रुप आणि शिवशक्ती आखाडा च्या विद्यार्थ्यांनी आखाडा प्रात्यक्षिके सादर केली. सी.बी. अँड बेरार चौक येथे जिम्नॅस्टिक असोसिएशन नागपूरच्या विद्यार्थ्यांनी जिम्नॅस्टिकचे प्रात्यक्षिक सादर केले.

ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

चिमुकले स्केटर्स, उंट व घोडे पथक, राजदरबार पोवाडा पथक, आदिवासी नृत्य, आखाडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा रथ, लेझीम पथक, शिवमुद्रा ढोलताशा पथक यांनी पदयात्रेमध्ये आपल्या कलांचे सादरीकरण केले. पदयात्रेमध्ये मनपाद्वारे रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पदयात्रेच्या राजे रघुजी भोसले स्मारक सक्करदरा, गजानन चौक जुनी शुक्रवारी, केशव द्वार चौक, रेशीमबाग चौक, सी.पी. अँड बेरार चौक, कोतवाली चौक ते गांधी गेट चौक या संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी पिण्याचे पाणी तसेच विद्यार्थ्यांसाठी खाऊची व्यवस्था देखील करण्यात आली होती.


विविध शाळा, महाविद्यालयांचा सहभाग

पदयात्रेमध्ये मनपा अग्निशमन पथक, मनपा संजयनगर हिंदी माध्यमिक शाळा, केशवनगर माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, कमला नेहरू महाविद्यालयातील, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी, मनोहरराव कामडी महाविद्यालय, गोविंदराव वंजारी महाविद्यालय, प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालय, श्री गजानन विद्यालय नवीन सुभेदार, बाबानानक सिंधी हिंदी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पुरुषोत्तम थोटे समाजकार्य महाविद्यालय, शासकीय दाभा वसतीगृह या शाळेतील विद्यार्थ्यांसह मनपाचे हिवताप व हत्तीरोग विभागाच्या कर्मचारी, मनपा ज्येष्ठ नागरिक मंडळ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुमारे १५ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी देखील पदयात्रेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी माँ साहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, मावळे अशा वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केली होती. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती तसेच महाल परिसरातील दादीबाई देशमुख मुलींची शाळा येथे रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते.

पदयात्रेमध्ये मनपाचे अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, सहायक आयुक्त सर्वश्री अशोक गराटे, घनश्याम पंधरे, विकास रायबोले, प्रमोद वानखेडे, नरेंद्र बावनकर, विजय थुल, धनंजय जाधव, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, कार्यकारी अभियंता सर्वश्री रवींद्र बुंधाडे, सुनील उईके, सचिन माटे, अनिल गेडाम आदी उपस्थित होते.

Advertisement