नागपूर : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात महावितरणच्या विजेचे दर सर्वाधिक असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महावितरणच्या कारभाराबाबत वीजग्राहकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
वीजदरात वाढ झाल्याने सर्वसामान्य जनता आधीच त्रस्त होती, पण आता त्याचा परिणाम सोलार प्रणालीचा वापर करणाऱ्यांवरही होणार आहे. महावितरण आता सौरऊर्जेपासून उरलेली अतिरिक्त वीज अतिशय कमी किमतीत खरेदी करेल आणि गरज पडल्यास ती ग्राहकांना जास्त किमतीत विकणार असल्याची माहिती ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनचे संचालक साकेत सुरी यांनी ‘नागपूर टुडे’ शी बोलताना दिली. येत्या काळात जर वीज दर कमी झाले नाही तर राज्यातील जनतेला मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचेही ते म्हणाले.
MSCDCL कडून महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर निश्चितीच्या प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यामध्ये व्हेरिएबल चार्ज वाढवण्यात आला नसल्याचे म्हटलं असलं तरी एकीकडे हे दर कमी करताना दुसऱ्या हाताने ग्राहकांच्या खिशात महावितरणने हात घातला आहे. त्यामुळे विजेच्या बिलांमध्ये 5 ते 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. नेमका हा गोंधळ काय आहे, याबाबत साकेत सुरी यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर निश्चितीसंदर्भात मांडण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये प्रत्यक्षात फिक्स चार्ज (स्थिर आकार) 12 ते 15 टक्क्यांनी वाढविला असून. व्हेरिएबल चार्ज वाढविला नसल्याचे म्हणत महावितरणाने स्वत:ची पाठ थोपटून घेतली आहे. मात्र, दोन्हीपैकी एक दर जरी वाढले तरी वाढीव वीज बिलाचे पैसे ग्राहकांच्याच खिशातून जाणार आहेत. एकंदरित संपूर्ण बेरीज-वजाबाकी केली तर ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक बसणार आहे.