नागपूर:शहरातील चिचभवन येथील युनिट क्रमांक 2 मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहात वॉर्डनच्या गैरवर्तनामुळे येथील विद्यार्थांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
वसतिगृहाच्या वॉर्डनच्या अपमानास्पद वागणुकीमुळे होणाऱ्या मानसिक छळाविरोधात येथील विद्यार्थांनी गृहप्रमुखांना वारंवार तक्रार केली. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.
मागील काही महिन्यांपासून, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि भावनिक त्रास दिला जात आहे. या सर्व त्रासामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनावर आणि शैक्षणिक कार्यावर नकारात्मक परिणाम झाला आहे, आणि त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
मुख्य समस्यांमध्ये वॉर्डनच्या वर्तनामुळे विद्यार्थ्यांना होणारा मानसिक त्रास, दुर्लक्ष, अपमानास्पद वागणूक, तसेच मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे विद्यार्थ्यांना भोगावा लागणारा तणाव हे प्रमुख आहेत. वॉर्डनच्या अपमानास्पद वागणुकीने विद्यार्थ्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवली आहे.तसेच वस्तिगृहात विद्यार्थांना देण्यात येणारे अन्न आणि पाणी देखील निकृष्ट दर्जाचे असल्याचे येथील विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्याथ्यर्थ्यांनी वसतिगृहातील पिण्याच्या पाण्याचा तुटवडा, स्वच्छता किंवा अन्नाच्या गुणवत्तेबाबत तक्रारी केल्या, तेव्हा वॉर्डन नेहमीच “मी तुमच्यासाठी नदी आणू का? तुमच्यासाठी मीच वसतिगृह चालवू का? अशा अपमानास्पद आणि उपहासात्मक शब्दांमध्ये प्रतिक्रिया देत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. वसतिगृहातील सफाई कर्मचारी स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वसतिगृहातील साधने वापरतात, ज्यामुळे परिसराची स्वच्छता योग्य प्रकारे केली जात नाही.मेसमध्ये वापरण्यात येणारी फळे आणि अत्र वॉर्डन स्वतःसाठी घेऊन जातात, असा आरोपही विद्यार्थांनी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या मागण्या –
1. सध्याच्या वॉर्डन यांना त्वरित काढून टाकण्यात यावे आणि विद्यार्थ्यांशी योग्य संवाद साधणाऱ्या
अधिकाऱ्याची नियुक्ती करावी.
2. विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तातडीने योग्य कारवाई केली जावी.
3. वसतिगृहात चांगल्या प्रशासनासाठी सक्षम वॉर्डनची नियुक्ती करण्यात यावी.
4. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेता, त्यांच्यासाठी समुपदेशन सेवा उपलब्ध करून द्यावी.