नागपूर : एकीकडे राज्यात दहावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे मनिषनगरातील एका हॉटेलमध्ये पोलिसांच्या छाप्यात ग्राहकासोबत सापडलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तिला पकडून सुधारगृहात टाकले. मात्र, ती दहावीची विद्यार्थिनी असल्यामुळे तिला दुसऱ्या दिवशी पेपर द्यायचा होता. नागपूर पोलिसांनी तत्परता दाखवत पोलिसांनी तिली विशेष पोलीस वाहन आणि महिला पोलिसांच्या मदतीने नागपूर ग्रामीण भागातील परिक्षा केंद्रावर जाण्याची व्यवस्था केली.
मुलीने पेपर सोडविला आणि पोलिसांनी तिला पुन्हा महिला सुधारगृहात पोहचवले. पीडित मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नागपूर पोलिसांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचे सर्व स्तवरावरून कौतुक करण्यात येत आहे.
माहितीनुसार नागपूर ग्रामीण भागातील रहिवाशी असलेल्या या १५ वर्षीय मुलीला पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास भाग पाडण्यात आले. तिचे आईवडिल शेतमजूर असून तिच्यासह लहान बहिण शिक्षण घेत आहे. दोन्ही मुलींच्या शिक्षणाचा खर्च आईवडिलांना झेपत नव्हता. आईवडिलांना थोडीफार आर्थिक मदत होईल म्हणून ही मुलगी कामाच्या शोधत होती.
झटपट पैसे कमविण्याचा मार्ग दाखविणाऱ्या मैत्रिणीच्या नादाला लागून ती ‘सेक्स रॅकेट’मध्ये अडकली. गेल्या १३ फेब्रुवारी २०२४ मध्ये मनिषनगरातील हॉटेल कृष्णकुंज येथे बेलतरोडी पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात प्रतीक्षाला ग्राहकासह पोलिसांनी ताब्यात घेतले. तिची पाटणकर चौकातील महिला सुधारगृहात रवानगी केली. या वर्षी ती मुलगी दहावीत असून गेल्या वर्षभरापासून ती सुधारगृहात अभ्यास करीत होती.
बेलतरोडी पोलिसांनी मुलीचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून मोटर वाहन विभागाला पत्र लिहून पोलीस वाहनाची व्यवस्था केली. महिला पोलिसांना आदेश देऊन मुलीला पूर्ण पेपर होई पर्यंत परिक्षा केंद्रावर सोडण्यात येत आहे.