Published On : Fri, Feb 28th, 2025
By Nagpur Today Nagpur News

गावांच्या सुरक्षिततेसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर: जिल्ह्यातील रामटेक, पेंच व पारशिवणी या परिसरात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेले भितीचे सावट दूर करण्यासाठी शासनातर्फे यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. यासाठी कोणत्याही प्रकारच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. एआय, आधुनिक तंत्रज्ञान, सौरऊर्जा, दहशतीत असलेल्या गावांना कुंपण, याबाबत प्रशासनातर्फे लवकरच योग्य ती पावले उचलून शक्य ती कामे लवकर सुरु केली जातील, या शब्दात राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामस्थांना धीर दिला.

पारशिवणी तालुक्यातील नवेगाव खैरी येथे वाघाच्या हल्ल्यामुळे भितीच्या सावटाखाली असलेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी एक व्यापक बैठक शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, वन विभागाच्या प्रधान वनसंरक्षक शोमिता विश्वास, वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास राव, प्रविण चव्हाण, श्रीलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपवन संरक्षक भारतसिंह हाडा तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.

Gold Rate
Friday 28 Feb. 2025
Gold 24 KT 85,400 /-
Gold 22 KT 79,400 /-
Silver / Kg 94,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशातील वाघांची संख्या कमी होऊ नये यासाठी वन विभागाने वन समित्यांच्या माध्यमातून केलेल्या उपाययोजनेतून वाघांची संख्या ही वाढविण्यामध्ये यश मिळाले. ज्या वाघांनी ग्रामस्थांवर दुदैवी हल्ले केले ते वाघ चवताळलेले नसून केवळ त्यांच्या हद्दींच्या बाहेर आल्याने हे संकट निर्माण झाले. यावर मात करण्याच्या दृष्टीने ज्या गावांमध्ये अती अत्यावश्यता आहे अशा गावांना सुरक्षा कुंपण, ज्या ठिकाणी मोकळ्या जागा उपलब्ध आहेत त्या ठिकाणी सौर ऊर्जाचे लघु प्रकल्प, सौर ऊर्जावर चालणारे मोठे लाईट्स, बांबु लागवड अशा उपाययोजनांसह एआयच्या माध्यमातून जे करता येणे शक्य आहे ते करु, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. त्यांनी कोढासावळी येथील वाघ हल्ल्यात मृत्युमूखी पडलेल्या दशरथ धोटे कुटुंबातील सदस्यांची त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली व सांत्वन केले. याचबरोबर त्यांनी पेंच परिसरातील काही गावांना भेटी देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.

केंद्र सरकारच्या मान्यतेने इतर राज्यात वाघांना हलवू- वनमंत्री गणेश नाईक

नागपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प व वाघांचा अधिवास असलेल्या क्षेत्रात वाघांची संख्या ही वाढली आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन यातील काही वाघ अन्य राज्यात स्थलांतरीत करण्याबाबत केंद्र सरकारशी विचार विनिमय करुन निर्णय घेऊ, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. याबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मदतीसाठी त्वरीत कार्यवाही करण्यावर अधिकाऱ्यांनी द्यावा भर- ॲड. आशिष जैस्वाल

ज्या कुटुंबांवर वाघाच्या हल्ल्यातून दुदैवी घाला पडला आहे, ज्या कुटुंबाने वाघाच्या हल्ल्यात आपले कुटुंबीय गमावले आहेत त्यांना तातडीने मदत कशी देता येईल याचा आम्ही विचार करीत आहोत. अधिकाऱ्यांनीही अशा प्रकरणी तातडीने कार्यवाही करुन आपल्या पातळीवरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल यांनी दिले. वनक्षेत्राच्या शेजारी असलेल्या गावांना केवळ वाघांची भिती नाही तर वन्य प्राणांकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्या शेतीतील पिकांचेही नुकसान होते. याची शेतकऱ्यांना भरपाई पोटी शक्य तेवढी मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांनी सकारात्मकता ठेवली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

पेंच परिसरातील देवलापार येथे साकारणार आधुनिक उपचार केंद्र

वाघाच्या हल्ल्यासह जंगलातील अन्य प्राण्यांकडून जखमी झालेल्या ग्रामस्थांना तत्काळ उपचार मिळावेत यादृष्टीने पेंच प्रकल्प परिसर अथवा शेजारच्या गावात चांगले उपचार केंद्र साकारण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी शासन सकारात्मक असून लवकरच याबाबत निर्णय घेवू असे या बैठकीत चर्चेअंती निश्चित करण्यात आले. खासदार श्यामकुमार बर्वे यांनी ग्रामस्थांच्या मनातील वाघाबद्दल निर्माण झालेली भिती व याचा शेतकामावर होणार दुष्परिणाम याकडे लक्ष वेधले.

Advertisement