नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाद्वारे शहरातील महिला उद्योजिका, बचत गटातील महिलांच्या कौशल्याला वाव मिळवून देण्याच्या हेतूने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे बुधवारी ५ मार्च रोजी २०२५ रोजी रेशीमबाग येथे विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त व प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक संचालक नगर रचना श्री. ऋतुराज जाधव, जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी उपस्थित होते.
महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय आयुक्त श्रीमती माधवी खोडे यांनी बचत गटाच्या महिलांना स्वतःचे ब्रँड बनवा, स्वतःच आपल्या ब्रँडची मार्केटिंग करा आणि जगभर आपले उत्पादन पोहोचवा, नागपूरचे नाव जगात क्रमांक एकवर आणा, असा प्रगतीचा मंत्र दिला. आपल्या उत्पादनात नावीन्य आणण्याचेही आवाहन त्यांनी केले. मनपाद्वारे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे त्यांनी कौतुक केले. बचत गटांना एकाचवेळी २५० स्टॉल्स उपलब्ध करून देणे ही मोठी उपलब्धी असल्याचे सांगत त्यांनी आयोजनाबाबत समाज विकास विभागाचे अभिनंदन केले.
महिलांमध्ये उद्योजकतेचे कौशल्य अंगी भिनलेले असतात. महिला शिक्षित असो वा अशिक्षित त्यांना घरातील आर्थिक ताळेबंद उत्तम जमते. त्यांच्यातील व्यवस्थापनाच्या या सुप्त गुणाला वाव देण्यासाठी शासनाने बचत गटांची योजना आणली. नागपूर महानगरपालिकेकडे ३४०० बचत गटांची नोंदणी आहे. मात्र त्यातील २२०० बचत गटांनी व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. इतर बचत गटांनी देखील बँकांकडून अर्थसहाय्य घेऊन आपल्या उद्योगांना भरारी घेऊ द्यावी, असे आवाहनही विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे यांनी केले.
महिलांच्या कौशल्याला स्थायी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील : डॉ. अभिजीत चौधरी
नागपूर महानगरपालिकेद्वारे महिला बचत गट आणि वैयक्तिक स्वरूपात उद्योग करणाऱ्या महिलांच्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मनपाद्वारे नियमित या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत होते मात्र कोव्हिडमुळे यात खंड पडला. सहा वर्षानंतर मनपाद्वारे पुन्हा महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन होत असल्याचा आनंद आहे. पुढील सात दिवस विविध उत्पादने आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी येथे असेल. मनपाद्वारे महिलांच्या कौशल्याला वाव देणारे हे तात्पुरते व्यासपीठ असून महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्थायी स्वरूपात व्यासपीठ उपलब्ध करण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. महिलांद्वारे तयार करण्यात आलेली दर्जेदार उत्पादने माफक दरात येथे उपलब्ध आहेत. उद्योजिका होण्यासाठी प्रयत्नशील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर शहरवासीयांनी महिला उद्योजिका मेळाव्याला अवश्य भेट द्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.
महिलांना पॅकेजिंग, मार्केटिंगचे प्रशिक्षण : श्रीमती आंचल गोयल
महिला उद्योजिका मेळाव्यामध्ये महिलांच्या कौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच महिलांसाठी आरोग्य शिबिर, विविध स्पर्धांच्या आयोजनासह त्यांना पॅकेजिंग, ई-मार्केटिंगचे प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी प्रास्ताविकामध्ये दिली. महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येत महिला रेशीमबाग मैदानात उद्योजिका मेळाव्याला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले. मागील दहा वर्षांमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने दीनदयाळ राष्ट्रीय नागरी उपजीविका केंद्रामध्ये शहरातील ३५ हजार महिलांना जोडून त्यांच्या कौशल्याला वाव देण्याचे काम केले आहे असे सांगतानाच महिलांनो उंच भरारी घ्या अवघे आकाश तुमचे आहे, असे आवाहनही श्रीमती आंचल गोयल यांनी केले.
कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वृषाली देशपांडे यांनी केले व आभार श्रीमती शारदा भूसारी यांनी मानले.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ मराठी संस्कृतीचा जागर
महिला उद्योजिका मेळाव्याच्या उदघाटनानंतर ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या मराठमोळ्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. मराठी गीते, अभंग, गोंधळ, धनगर नृत्य, गणपती स्तवन यांचे यावेळी सादरीकरण झाले. कार्यक्रमामध्ये श्री. सचिन डोंगरे, श्री. अनिल पालकर व त्यांच्या समूहाने आपली कला सादर केली.
महिला उद्योजिका मेळाव्यात ६ मार्च रोजी श्री. प्रसन्न जोशी आणि त्यांच्या चमूद्वारे गझल संध्या कार्यक्रमाचे सादरीकरण केले जाईल. ७ मार्च रोजी श्री. सचिन डोंगरे ग्रुप व अवंती काटे ग्रुप यांचे नृत्य रंग कार्यक्रम सादर केले जाणार आहे. ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका स्थापनेच्या अमृत महोत्सवा निमित्त फॅशन शो चे आयोजन करण्यात आले आहे. ९ मार्च रोजी हृषिकेश रानडे व त्यांच्या चमूचे ‘लाईव्ह इन कॉन्सर्ट’ आयोजित करण्यात आले आहे. १० मार्च रोजी श्री. राजेश चिटणीस आणि त्यांच्या ग्रुपद्वारे हिंदी मराठी गाण्यांचा स्वरजल्लोष कार्यक्रम तसेच कॉमेडी तडका कार्यक्रम सादर केले जाईल. ११ मार्च रोजी निश्चयाचा महामेरू हा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम श्रेया खराबे व त्यांच्या चमूद्वारे सादर करण्यात येणार आहे. ११ मार्च रोजी महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप होईल.