नागपूर : नागपुरातील ऐतिहासिक झीरो माईल चे सौंदर्यीकरण आणि विकास करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाने शासनाच्या अधीन असलेली ही जागा नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांनी गुरुवारी (ता. ६ मार्च) आयोजित बैठकीत दिले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना ऐतिहासिक झीरो माईलचे सौंदर्यीकरण आणि विकास करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनतर्फे सीएसआर निधी देण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाच्या अनुषंगाने गुरुवारी (ता.६) मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षामध्ये हेरिटेज संवर्धन समितीची बैठक घेण्यात आली. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांच्या अध्यक्षतेतील या बैठकीत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, मुख्य अभियंता आणि समितीच्या सदस्य सचिव श्रीमती लीना उपाध्ये, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक श्री. अतुल गुप्ता व उपमहाव्यवस्थापक श्री. प्रदीप पॉल उपस्थित होते.
सौंदर्यीकरण आणि विकासासाठी झीरो माईल लगतची शासनाची सर्व जागा यासाठी उपलब्ध करुन देण्यात यावी, असेही निर्देश समितीचे अध्यक्ष डॉ. अनूप कुमार यांनी दिले. मनपाच्या जागेवर पर्यटकांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. झीरो माईलचे सौंदर्यीकरण महाराष्ट्र शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे करण्यात येत आहे. या लगतच्या जागेचा विकास करण्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तर्फे प्राप्त निधीच्या उपयोग करण्यात येईल, अशी माहिती मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बैठकीमध्ये दिली.