Published On : Thu, Mar 6th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भय्याजी जोशींच्या विधानाशी महाराष्ट्रातील भाजप सहमत आहे का? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Advertisement

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना मराठी भाषेबाबत एक विधान केले. मुंबईची कोणतीही एक भाषा नसल्याचे विधान करत घाटकोपरची भाषा ही गुजराती असल्याची मुक्ताफळे उधळली होती. यावर सर्व स्तरावरून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी या विधानावर सविस्तर भूमिका मांडली.

राज ठाकरे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणं गरजेचं नाही, असे विधान केल्याच ऐकले.

Gold Rate
thursday 06 March 2025
Gold 24 KT 86,600 /-
Gold 22 KT 80,500 /-
Silver / Kg 97,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

देशाची झालेली भाषावार प्रांत रचना, त्यात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून १०६ हुतात्म्यांनी दिलेले बलिदान या सगळ्याबद्दल भय्याजी जोशींना माहीत नसेल असं अजिबात नाही. पण कायम महाराष्ट्राबद्दलच किंवा मराठीबद्दलची अशी विधाने करायची याचं कारण काय ? भय्याजी जोशींनी असंच विधान बेंगळुरू किंवा चेन्नईत करून दाखवावं…. आणि भय्याजी जोशींच्या या विधानाशी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष सहमत आहे का ? उद्या समजा संघाच्या सोडाच इतर कुठल्याही जबाबदार व्यक्तीने असं विधान जर इतर राज्यात केलं असतं तर त्या राज्यातील सर्व पक्षांनी निषेध नोंदवला असता… भारतीय जनता पक्ष महाराष्ट्राच्या अस्मितेला प्राधान्य देऊन निषेध नोंदवणार आहे का ? सध्या MMR रिजन मधे चाललेला विकास आणि त्यामागील राजकीय हेतू हे जोशींच्या वक्तव्यातून सुरवात होताना दिसत आहेत.

हे काय चाललय हे न समजण्या इतकी मराठी जनता दुधखुळी नाही हे जोशींनी लक्षात घ्यावं ! हे राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडाव ? आत्ताच कोल्डप्ले नावाचा वाद्यवृंद मुंबईत येऊन गेला . त्याचे मुख्य गायक ख्रिस मार्टिन हे देखील इथे येउन मराठीत बोलून गेले . त्या ब्रिटिश माणसालाही मुंबईत कोणती भाषा चालते आणि ही मुंबई कोणाची आहे हे समजते तर मग जोशी बुवांना हे समजू नये ? या असल्या काड्या घालून ( अर्थात राजकीय हेतू असल्या शिवाय हे होणे नाही ) नवा संघर्ष आपण उदयाला आणत आहात हे जरूर ध्यानात ठेवावे !

बाकी सविस्तर ३० तारखेला गुढीपाडव्याला बोलूच ! महाराष्ट्र नवनिर्माण सेना या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशीबुवांनी लक्षात ठेवावे, असे राज ठाकरे म्हणाले.

Advertisement