नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना सशक्त करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. याचाच एक भाग म्हणून जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी एक नाविन्यपूर्ण निर्णय घेतला. त्यांनी आपल्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, यूट्यूब आणि व्हॉट्सअॅप या सहा सोशल मीडिया अकाउंट्स देशातील प्रेरणादायी महिलांना दिले. या स्त्रियांनी आपल्या यशस्वी प्रवासाबद्दल आणि आव्हानांबद्दल संपूर्ण देशासोबत अनुभव शेअर केले.
या महिलांचा भारताच्या विविध भागांशी संबंध आहे. यात तामिळनाडूच्या चेन्नई येथील बुद्धिबळपटू वैशाली रमेशबाबू, दिल्लीतील डॉ. अंजली अगरवाल, बिहारच्या नालंदामधील अनिता देवी, ओडिशातील भुवनेश्वरमधील एलिना मिश्रा, राजस्थानमधील अजयता शाह आणि मध्य प्रदेशातील सागर येथील शिल्पी सोनी यांचा समावेश आहे. यातील चार महिलांनी आपले अनुभव वैयक्तिकरित्या मांडले, तर एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी यांनी त्यांचा प्रवास एकत्रितपणे शेअर केला. या महिला विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा, उद्योजकता आणि सामाजिक कार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात.
‘या’ महिलांनी सांगितली त्यांच्या यशस्वी प्रवासाची कहाणी –
वैशाली रमेशबाबू- लहान वयात बुद्धिबळात प्रावीण्य मिळवणाऱ्या वैशालीने वयाच्या सहाव्या वर्षी बुद्धिबळ खेळायला सुरुवात केली. ती बुद्धिबळातील एक नामांकित खेळाडू असून, 2023 मध्ये तिने ग्रँडमास्टर पदवी मिळवली. तिच्या कौशल्याने भारताच्या बुद्धिबळ क्षेत्रात मोठी भर पडली आहे.
अनिता देवी- बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील अनिता देवी यांना ‘बिहारची मशरूम महिला’ म्हणून ओळखले जाते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी माधोपूर फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची स्थापना केली. त्यांनी मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार दिला आणि त्यांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवला.
एलिना मिश्रा आणि शिल्पी सोनी-
एलिना मिश्रा या भाभा अणु संशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे अणुशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत, तर शिल्पी सोनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) एक प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे.
अजयता शाह- फ्रंटियर मार्केट्सच्या संस्थापक आणि सीईओ असलेल्या अजयता शाह यांनी ग्रामीण भारतातील 35,000 हून अधिक महिलांना डिजिटलदृष्ट्या सक्षम बनवले आहे. त्यांनी ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्याचे कार्य केले आहे, ज्यामुळे अनेक महिला स्वयंपूर्ण व्यावसायिक बनल्या आहेत.
डॉ. अंजली अगरवाल-समर्थ्यम सेंटर फॉर युनिव्हर्सल ऍक्सेसिबिलिटीच्या संस्थापिका असलेल्या डॉ. अंजली अगरवाल यांनी तीन दशकांपासून अपंग व्यक्तींसाठी समावेशक गतिशीलता आणि अडथळामुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळा आणि सार्वजनिक स्थळे दिव्यांग व्यक्तींसाठी अधिक सुलभ बनली आहेत. या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने नारीशक्तीचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे. या उपक्रमातून हे स्पष्ट होते की, महिला केवळ सहभागीच नाहीत, तर भारताच्या प्रगतीला आकार देण्यामध्ये अग्रस्थानी आहेत.