नागपूर: नागपुरात एका तरुणाने रस्त्याच्या मध्यभागी तरुणीसमोर अश्लील कृत्य केल्याची लाजिरवाणी घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना एका नागरिकाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आणि ती सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. हा प्रकार समोर येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
ही घटना बजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निरी रोडवर घडली. श्यामकुमार असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा कर्नाटकचा रहिवासी आहे. तो काही महिन्यांपासून नागपुरातील एका हॉटेलमध्ये काम करत होता.
आरोपीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले
पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला असून त्यात अनेक आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओ आढळले आहेत. नागपूर पोलीस (झोन-२) उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले की, आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
“आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल,” असे डीसीपी राहुल मदने यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे नागपुरात नागरिकांमध्ये महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत असून आरोपीचा मागील आपराधिक इतिहास आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.