नागपूर : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. मात्र यादरम्यान राज्य सरकारने मागील वर्षी सुरु केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद केल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता.
या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. दरम्यान, आता ही योजना बंद करण्यात आल्यामुळे रेशनकार्ड धारकांना मोठा फटका बसणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी काल मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा या योजनेबाबत कोणतीही तरतूद केली नसल्याने ही योजना बंद झाल्याचे बोलले जात आहे. यावरून आता विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले.
काँग्रेसच्या नेत्यांची टीका –
महायुती सरकारने याअगोदर शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा या योजनांचा निवडणुकीच्या काळात उपयोग करुन घेतला आणि आता त्या बंद केल्या जात आहेत. या माध्यमातून जनतेला गाजर दाखवण्याचं काम सुरू असल्याचा घणाघात जगताप यांनी केला.
काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी या योजनेवरुन राज्य सरकारचा समाचार घेतला. एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या योजना आता बंद करण्यात येत आहे. यावरून सरकारमध्ये त्यांचे महत्त्व कमी होताना दिसते, असे वडेट्टीवार म्हणाले.