नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या प्रशांत कोरटकर याची चतुराई समोर आली आहे. कोरटकर याने डेटा डिलिट करून मोबाइल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी जिल्हा न्यायालयात दिली.
काही दिवसांपूर्वी कोरटकर याच्या पत्नीने त्याचा मोबाईल फोन नागपूर सायबर पोलिसांना सुपूर्द केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार नागपूर पोलिसांनी तो जुना राजवाडा पोलिसांना दिला. मात्र, मोबाइलमध्ये कॉल डिटेल्स असले तरी संभाषणाचे रेकॉर्डिंग नाही. डेटा डिलिट करून त्याने मोबाइल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती न्यायालयात दिली.
दरम्यान वकिलांच्या विनंतीनंतर दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी कोरटकरच्या अंतरिम जामिनात एक दिवसाची वाढ केली. त्याने सुनावणीसाठी प्रत्यक्ष हजर राहावे की नको, याबाबत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाला. त्यावर आज, बुधवारी सुनावणी होईल.