विरार: एकीकडे नुकत्याच पार पडलेल्या १२वीच्या परिक्षेच्या चिंतेतून विद्यार्थी मुक्त झाले आहेत. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे टेन्शन वाढवणारी एक घटना विरार येथे घडली आहे. १२वी कॉमर्सच्या उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन आलेल्या शिक्षिकेच्या घरात उत्तर पत्रिकांना आग लागली. विरार पश्चिम येथील गंगुबाई अपार्टमेंट, नानभाट रोड, बोळींज, आगाशी परिसरात राहणाऱ्या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली आहे. या शिक्षिकेने १२ वी कॉमर्सचे पेपर रीचेकिंग साठी घरी आणले होते. या पेपरचा गठ्ठा त्यांनी सोफ्यावर ठेवला होता. काही वेळाकरिता शिक्षिकेच्या घरातील लोक बाहेर गेले. शिक्षिकेचं घर बंद असताना अचानक शॉर्ट सर्किट झाला आणि आग लागली. त्यामध्ये घरातील इतर सामानासहित विद्यार्थ्यांच्या बारावी कॉमर्सच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या.
विद्यार्थांच्या भविष्याची राखरांगोळी-
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता वाढली आहे. ही शिक्षिका कोणत्या शाळेची आहे? यात कुणाचा निष्काळजीपणा आहे? पेपर जाळले की जळाले? याचा बोळींज पोलीस तपास करत आहेत.
शिक्षिके विरोधात गुन्हा दाखल –
बारावीच्या उत्तरपत्रिका जळाल्या प्रकरणी विरारमधील प्राचार्य आणि शिक्षकांवर बोळींज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तरपत्रिका घरी नेण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररित्या या उत्तरपत्रिका घरी नेण्यात आल्याचा ठपका ठेवत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारावी कॉमर्सच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या 175 उत्तरपत्रिका जळाल्या होत्या.
या प्रकरण महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बोर्डाच्या विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे यांनी विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. विरारच्या नानाभात या परिसरात राहणाऱ्या प्रिया रोड्रिंक्स या शिक्षिकेच्या घरी ही घटना घडली. उत्तर पत्रिका जळाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत बोळींज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
जळालेल्या उत्तरपत्रिका पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही- माहितीनुसार जळालेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी करून त्याचे गुणदान झाले असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. कारण गुणदान केलेला कागद सुरक्षित आहे अशी माहिती आहे. आत्पकालीन परिस्थिती आल्यास उत्तरपत्रिका नष्ट झाली असल्यास इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून संबंधित विषयाचे गुण देण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याची माहिती आहे.