नागपूर टुडे – नागपूरच्या न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती सुलताना मैमुना यांच्या न्यायालयात रात्री तब्बल 2.50 वाजेपर्यंत सुनावणी सुरू होती. संपूर्ण शहर झोपी गेले असताना, कोर्टात दलील-वाद सुरूच होते.
महल परिसरात झालेल्या दंगलीमुळे संपूर्ण भागात तणावपूर्ण स्थिती आहे. मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाल्यानंतर पोलिसांनी या भागात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
27 आरोपींना न्यायालयात हजर, विशेष सुरक्षा व्यवस्था
गणेशपेठ पोलिसांनी मंगळवारी महल दंगल प्रकरणातील 51 पैकी 27 आरोपींना न्यायिक मजिस्ट्रेट प्रथम श्रेणी (JMFC) कोर्टात हजर केले. या सुनावणीसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती.
बचाव पक्षाचा आरोप – पोलिसांनी निर्दोषांना अटक केली!
सरकारी पक्षातर्फे आरोपींची चौकशी सुरू असताना, बचाव पक्षाने आरोप केला की, अनेक आरोपींचा या दंगलीशी काहीही संबंध नव्हता. भालदारपुरा परिसरातील स्थानिक नव्हे, तर बाहेरच्या व्यक्तींनी हिंसाचार घडवला. बचाव पक्षातर्फे वकील रफीक अकबानी व ईतर वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी काही आरोपींना अत्यंत कठोरपणे मारहाण केली, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापती झाल्या आहेत.
सरकारी वकीलांचा प्रतिवाद पोलिस कोठडी आवश्यक !
सरकारी वकील श्रीमती मेघा बुरंगे यांनी हे आरोप फेटाळून लावत आरोपींना पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे ठामपणे मांडले. अखेर कोर्टाने चार आरोपींना न्यायालयीन कोठडी (MCR) सुनावली, तर उर्वरित काही आरोपींना उपचाराकारिता शासकीय रुग्नालयात व काही आरोपीना दोन दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली.
मुख्य सरकारी अभियोक्त्यांची पुष्टी
जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य सरकारी अभियोक्ता नितीन तेलगोटे यांनी रात्री तीन वाजता ‘नागपूर टुडे’शी संवाद साधत या प्रकरणाची अधिकृत पुष्टी दिली.
– रविकांत कांबळे