नागपूर : दिशा सालियनचे मृत्यूप्रकरण पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत दिशाच्या मृत्यूप्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना घेरण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
ही सगळी चर्चा कोर्टाच्या केसमुळे सुरू झाली. उच्च न्यायालयात एका वकिलानं याचिका दाखल केली आहे. दिशा सालियनच्या वडिलांनीही एक मुलाखत दिली आहे. शासनाची भूमिका यासंदर्भात पक्की आहे. न्यायालय काय म्हणतंय? न्यायालयात ते काय पुरावे देत आहेत? यावर पुढची भूमिका ठरेल, असे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले.
हा विषय सध्या तरी शासनाच्या किंवा पोलिसांच्या पातळीवर नाही. न्यायालय ज्या प्रकारे आम्हाला आदेश देईल किंवा न्यायालयात जर काही नवीन पुरावे, गोष्टी आल्या तर त्या आधारावर त्या वेळी सरकार निर्णय घेईल. आत्तातरी आम्ही न्यायालयाकडे नजर ठेवून आहोत, असे ते म्हणाले.