मुंबई : राज्यातील बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर आजाराला समोर जावे लागले.या आजाराची गंभीरता लक्षात घेता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या आजारावर भाष्य करत सरकारवर ताशेरे ओढले.
डिसेंबरच्या पंधरवाड्यात बुलढाणा जिल्ह्यातील तीन तालुक्यातील १९ गावात केस गळून टक्कल पडण्याचे प्रकार झाले. ही टक्कल का पडत आहेत? याचे शास्त्रीय कारण सरकारने अजून दिले नाही. सरकार आता टकलावर केस येत आहेत हे सांगत आहे, यासाठी कोणते तेल वापरले असे सरकारला विचारावे का? असे म्हणत केस गळती का झाली? याचे शास्त्रीय कारण मात्र देत नाहीत. ज्या भागात केस गळती झाली तो खारपाण पट्टा आहे. केस गळतीच्या तक्रारी आल्यानंतर सरकारने त्याची चौकशी केली पण त्यासंदर्भातला ICMR चा अहवाल अजून आलेला नाही असे सरकार सांगत आहे. मग सरकराने त्यांचा माणूस त्या संस्थेकडे पाठवावा, ही संस्था काय चंद्रावर आहे का? पण सरकार हा अहवाल दडपण्याचा प्रयत्न करत आहे किंवा अहवाल बदलण्याचा प्रयत्न करत आहे, असे सपकाळ म्हणाले.
राज्य सरकारचा अहवाल आला नसला तरी दुसरीकडे प्रख्यात डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री हिम्मतराव साळुबा बावस्कर यांनी मात्र त्या भागातील त्वचेचे, नखाचे, मातीचे व रेशनवर वितरीत करण्यात आलेल्या गव्हाचे सॅम्पल गोळा करून, त्याची प्रयोगशाळेत तपासणी करून त्याचा अहवाल सरकारला दिला. हा सर्व प्रकार सार्वजनिक वितरण प्रणालीतील गव्हामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गव्हात मोठ्या प्रमाणात सेलेनियम आढळून आले आहे ते तब्बल १४ टक्के पेक्षा जास्त आहे. सेलेनियम १.९ टक्के पर्यंत हानीकारक नाही पण सेलेनियम अधिक प्रमाणात असल्यामुळे मळमळ येणे, खाज येणे, मधुमेहाच्या तक्रारी येतात हे संशोधन आहे आणि यातून ते एका निष्कर्षापर्यंत पोहचले व तसा पत्रव्यवहार बावस्कर यांनी शासनाशी केला पण सरकारने त्यांच्या अहवालाला केराची टोपली दाखविल्याचा घणाघात सपकाळ यांनी केला.