मुंबई:महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी गुढी पाडव्याच्या मेळाव्यामध्ये राजकीय घडामोडीवर भाष्य केले.
निवडणूक काळात देण्यात आलेली अनेक आश्वासनांची आठवण करून देत त्यांनी महायुती सरकारवर ताशेरे ओढले.तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेबद्दलही सूचक विधान केले. महाराष्ट्रातील जनतेला मला विचारायचं आहे, की तुम्ही इतक्या भाबडेपणाने मतदान करता तरी कसे.
ही लाडकी बहीण योजना… आता या लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये करणार, जर २१०० रुपये केले तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवर ६३ हजार कोटीचं कर्ज होईल. म्हणजे पाच वर्षाचे तीन ते चार लाख कोटी होतात.
हे पैसे फक्त वाटण्यासाठी. पण ते वाटू शकत नाहीत, सरकारकडे पैसे नाहीत, ती ही देखील योजना बंद होणार. कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितली कोणी? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणुकीत मतं मिळवण्यासाठी जातीचे राजकारण केले जाते.
निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असं सांगितलं होतं. पण अजित पवार म्हणाले ३० तारखेपर्यंत कर्ज भरुन टाका, कर्जमाफी होणार नाही. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही वाट्टेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणुका संपल्यानंतर, लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावर बोलणार पैसे भरुन टाका म्हणून,असा घणाघात राज ठाकरेंनी केला.