मुंबई – पुरोगामीतेच्या गप्पा मारणारे अजित पवार सत्तेसाठी धर्मांध शक्तींच्या पायावर लोटांगण घालत आहेत,असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. यावरून ते सत्तेसाठी लाचार दिसतात.केंद्र सरकारच्या वक्फ सुधारणा विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्यावरून सपकाळ यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली. बुधवारी मध्यरात्री लोकसभेने आणि गुरुवारी मध्यरात्री राज्यसभेने हे विधेयक मंजूर केले. आता ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात येणार आहे. या विधेयकामुळे मुस्लिम समाजाच्या मालमत्तेच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचा आरोप करण्यात येतो.
सपकाळ म्हणाले, अजित पवार म्हणतात आम्ही शाहू, फुले, आंबेडकर यांचा वारसा चालवतो, पण प्रत्यक्षात त्यांनी धर्मनिरपेक्षतेला पायावर तुडवले आहे. इफ्तार पार्टीत मुस्लिम समाजाच्या पाठीशी असल्याचे सांगणारे अजित पवार, काही दिवसांतच त्यांच्या विरोधातील विधेयकाला पाठिंबा देतात, हे त्यांच्या ढोंगी स्वभावाचे उदाहरण आहे.
शरद पवारांचा पक्ष चोरून भाजपला दिला -अजित पवार यांनी आपल्या चुलत्यांचा पक्ष चोरून भाजपच्या मदतीने सत्ता मिळवली. त्यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह देखील हडप केले. आता ते सत्तेसाठी कोणत्याही थराला जात आहेत, अशी टीकाही सपकाळ यांनी केली.
मुस्लिम समाजाशी विश्वासघात –
जनता सावध राहावी “वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा देणे म्हणजे मुस्लिम समाजाच्या हक्कांवर घाला घालणे होय. यामुळे अजित पवारांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत हे पुन्हा सिद्ध झाले. जनतेने त्यांच्या फसव्या गोडगोड बोलण्याला बळी पडू नये, असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.