नागपूर – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांनी रविवारी नागपूरमधील भाजप कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनावेळी भाषण करताना पुन्हा एकदा आपल्या अनोख्या शैलीत पक्ष आणि नेत्यांना थेट सल्ला दिला. यावेळी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना स्पष्टपणे काही मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं.
गडकरी म्हणाले की, मी जेव्हा प्रदेशाध्यक्ष होतो, तेव्हा मी अनेक जाती प्रकोष्ठ सुरू केले होते. त्यावेळी अनेकांनी त्याचा विरोध केला, पण माझा हेतू सर्व जातींना एकत्र आणण्याचा होता. मात्र, प्रत्यक्षात या प्रकोष्ठांमुळे पक्षात कोणतीच जात विशेषतः जोडली गेली नाही. उलटपक्षी, जे जातीय नेते पक्षात आले, त्यांना त्यांच्या जातीतील लोकांनीच नाकारलं.”
गडकरी पुढे म्हणाले, जेव्हा मनपा निवडणुका लागतील, तेव्हा या जाती प्रकोष्ठांकडून बावनकुळे यांना शेकडो शिफारशी येतील. तेव्हा त्यांना समजेल की हे प्रकोष्ठ तयार करणं किती मोठी चूक होती.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भाजप ही माझी कुटुंब आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे. जसं आपण आपल्या मुलांना प्रेम करतो, तसंच पक्षातील कार्यकर्त्यांनाही तितकंच प्रेम दिलं पाहिजे.
या सल्ल्याच्या माध्यमातून गडकरींनी स्पष्ट केले की पक्ष संघटनामध्ये जातीच्या आधारावर भूमिका न घेता कार्यकर्त्यांचा सन्मान व पक्षप्रेम अधिक महत्त्वाचे आहे.