नागपूर : क्रिकेट प्रेमींसाठी ही एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विदर्भाला आता आपली स्वतःची प्रोफेशनल T20 लीग मिळणार आहे. यासंदर्भात ‘नागपूर टुडे’च्या टीमने विदर्भ प्रो T20 लीगचे अध्यक्ष प्रशांत वैद्य यांच्याशी संवाद साधला. लीगमध्ये किती संघ असतील, खेळाडूंची निवड कशी होईल, लिलावाची प्रक्रिया, आणि सामने कधी-कुठे होतील याबाबत त्यांनी थोडक्यात माहिती दिली.
VPTL मध्ये किती संघ?
विदर्भातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली प्रतिभा दाखवण्याची मोठी संधी या लीगच्या माध्यमातून मिळणार आहे. यात पुरुष विभागाचे ६ संघ असतील. तर महिला विभागाचे ३ संघ स्पर्धेत सहभागी होतील. ही स्पर्धा IPL नंतर सुरु होणार असून, अंतिम सामना १० ते १२ जून दरम्यान खेळवण्याचे नियोजन आम्ही आखले असल्याचे प्रशांत वैद्य म्हणाले. ही लीग विदर्भाच्या क्रिकेट संस्कृतीला एक नवी दिशा देईल आणि तरुणांना प्रोफेशनल करिअरकडे घेऊन जाईल. खेळाडूंसाठी ट्रायल्स, कोचिंग कॅम्प्स आणि रजिस्ट्रेशनसंबंधी सर्व माहिती लवकरच जाहीर होणार आहे.
फ्रँचायझी घ्यायची असल्यास प्रक्रिया काय?
फ्रँचायझी घेण्याची सविस्तर माहिती VCA च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. प्रशांत वैद्य यांनी नमूद केले की, क्रिकेट ही लोकप्रिय आणि स्वीकारली गेलेली खेळ असल्यामुळे फ्रँचायझी मालकांना अनेक फायदे मिळू शकतात, असे वैद्य म्हणाले.
प्रवेश विनामूल्य-
या लीगमध्ये प्रवेश पूर्णतः मोफत असणार आहे. विदर्भातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रशांत वैद्य यांनी केले आहे.