मुंबई : काँग्रेस पक्षामध्ये मुस्लिम अध्यक्ष का नाही? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या प्रश्नावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर भाजप आमच्याकडे विचारत असेल की काँग्रेसचा अध्यक्ष मुस्लिम का नाही तर मी देखील विचारू इच्छितो,कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) किंवा भाजपचा प्रमुख मुस्लिम होणार का? असा सवाल करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
वडेट्टीवार म्हणाले, देशभरात भाजपने धार्मिकतेच्या राजकारणाचा बाजार मांडला आहे. पंतप्रधानांनी कोणत्याही धर्मावर टीका करू नये, अशीच देशवासियांची अपेक्षा आहे. देवाची जागा मंदिरात नाही, तर माणसाच्या मनात असायला हवी. मात्र सध्या देवाचाही वापर राजकारणासाठी होत आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे.
देवालाही राजकारणात ओढले जातंय –
देवाचं नाव घेऊन जर राजकारण केलं जात असेल, तर देव मंदिरात राहणार नाही, असं सांगत त्यांनी भगवंतालाही राजकारणात खेचलं जात असल्याचा आरोप केला. देव आपल्या श्रद्धेत असतो, राजकारणात नाही,असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
‘मुस्लिमांचे भले करण्यापासून मोदींना कोणी थांबवले?’
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसने कधीही मुस्लिम समाजाच्या भल्यासाठी काही केलं नाही, असं वक्तव्य केलं होतं. त्यावर प्रत्युत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले, “तुमच्याकडे एकही मुस्लिम मंत्री नाही. मग तुम्ही मुस्लिम समाजासाठी काय केलं? तुम्हाला कोणी अडवलं आहे? जे आम्ही केलं नाही, ते तुम्ही करून दाखवा. वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी काळात भाजपकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.