यवतमाळ (आर्णी): “पाणी हे जीवन आहे”, असं आपण म्हणतो. पण याच जीवनदायी पाण्यासाठी वणवण करत एका 12 वर्षांच्या चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील काठोडा पारधी बेड्यावर वेदिका चव्हाण हिचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून प्रशासनाच्या दुर्लक्षाची गाथा पुन्हा एकदा समोर आली आहे.
वेदिकाच्या घरासमोर सरकारी पाईपलाईन गेली एक वर्ष उभी असली, तरी अद्याप एकही थेंब पाणी त्या नळातून आलेलं नाही. वस्तीतील एकमेव हातपंप चार महिन्यांपासून बंद असून, संपूर्ण गाव पाण्यासाठी नदीवर अवलंबून आहे. वेदिका देखील अशाच एका पाण्याच्या खेपेसाठी गेली आणि परतलीच नाही…
प्रशासनाच्या थातूरमातूर उपाययोजना-
वेदिकाच्या मृत्यूनंतर वस्तीतील लोकांमध्ये तीव्र संताप आहे. वेदिकाचं आयुष्य वाचवता आलं नाही, पण किमान आता तरी या गावांना पाण्याची सोय व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. धक्कादायक म्हणजे प्रशासनाने वेदिकाच्या मृत्यूनंतर त्या बंद हातपंपाला झाकण घालून प्रकरणावर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.
काही दिवसांपूर्वी आमदार राजू तोडसाम यांनी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले होते, मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल झाला नाही.
लातूर जिल्ह्यातही तीच तऱ्हा-
या जलसंकटाचं दृश्य केवळ यवतमाळपुरतं मर्यादित नाही. लातूर जिल्ह्यातील नागलगाव व आजूबाजूच्या आठ तांडा वस्त्यांमध्ये पाण्यासाठी महिलांची धावपळ सुरूच आहे. लाखोंच्या योजना मंजूर झाल्या, कामं झाली, पण नळांमधून अजूनही एक थेंब पाणी नाही. महिलांना दोन घागरी पाण्यासाठी रात्रभर हातपंपाच्या रांगेत उभं राहावं लागतं.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया: “जिल्हानिहाय योजना तयार”
यवतमाळमधील १२ वर्षांच्या मुलीच्या मृत्यूवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया दिली. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र जलसंकट योजना तयार केली असून, पाणीटंचाई असलेल्या भागांत टँकर व इतर माध्यमांतून पाणीपुरवठा करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. कायमस्वरूपी उपाययोजना सुरू असून, एप्रिल-मे महिन्यांत निर्माण होणाऱ्या जलसंकटासाठी आधीच नियोजन करण्यात येते. ‘हर घर नल’ योजनेअंतर्गत काम सुरू, मात्र या विशिष्ट घटनेबाबत सविस्तर माहिती नसल्याने सध्या अधिक बोलणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेचा गंभीरतेने अभ्यास करून समस्येचे मूळ शोधून उपाय केले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
आम्ही आमचं मूल गमावलं, पण दुसऱ्या कोणाचं नको-
वेदिकाचे वडील रूपेश चव्हाण यांनी भावना व्यक्त करताना सांगितलं, “वेदिका रोज पाणी भरण्यासाठी नदीवर जायची. आज ती नाही. आम्ही आमचं मूल गमावलं. पण दुसऱ्या कोणाचं मूल असं जावं नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पाण्याची सोय करावी.एक मूल नदीत बुडून गेलं, पण प्रश्न हा संपूर्ण व्यवस्थेचा आहे. पाण्यासारख्या मूलभूत हक्कासाठी देखील लोकांना जीव गमवावा लागतो, ही आपली शोकांतिका आहे.