मुंबई :राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन वेगळी वाट चोखाळलेले नेते आता पुन्हा एकत्र येण्याच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत “महाराष्ट्राच्या हितासाठी काहीच मोठं नाही” असं स्पष्ट करत सहकार्याची भूमिका घेतली. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनीही “वाद काही नाही” असे सांगत एकत्र येण्याचा रस्ता खुला ठेवला.
या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखात, या दोघांमधील संभाव्य एकतेला दुजोरा देत, विरोधकांना डिवचण्यात आलं आहे. “दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय,” अशा शब्दांत ही एकता अनेकांना अस्वस्थ करत असल्याचा टोला भाजपसह इतर राजकीय शक्तींना मारण्यात आला आहे.
‘सामना’ने भाजपवर टीकास्त्र चालवत म्हटले की, “त्यांचे राजकारण हे वापरा आणि फेका वृत्तीचे आहे.” मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप करत महाराष्ट्रात “विषारी राजकारण” पसरवल्याचा आरोप करण्यात आला. राज ठाकरे यांना नकली हिंदुत्वाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्या पक्षाचे नुकसान झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेनेतून वेगळं होऊन मनसे स्थापन केली, काही काळ जनतेचा पाठिंबा लाभला, मात्र पुढे भाजपसारख्या पक्षांनी त्यांचा केवळ वापर केला, असा दावा लेखात करण्यात आला आहे. त्याच वेळी उद्धव ठाकरे यांनीही ‘महाराष्ट्राच्या शत्रूंना’ घरात थारा न देण्याची स्पष्ट भूमिका मांडली आहे. मतभेद बाजूला ठेवून, फक्त महाराष्ट्राच्या भल्यासाठी हातमिळवणी होईल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंची आहे.
“राज ठाकरेंचा जन्मही शिवसेनेच्या गर्भातूनच झाला आहे. त्यामुळे आता एकत्र येऊन जर महाराष्ट्रासाठी नवं पर्व सुरू होत असेल, तर त्या अमृताचा आस्वाद मराठी जनतेला हवाच आहे,” अशा शब्दांत ‘सामना’ने मराठी स्वाभिमान आणि एकतेचा नवा सूर लावला आहे.