नागपूर: जम्मू काश्मीरमधील बैसरन व्हॅली येथे निरपराध भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शहरप्रमुख नितीन तिवारी यांच्या नेतृत्वाखाली बर्डी येथील गांधीपुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
या वेळी शिवसैनिकांनी “पाकिस्तान मुर्दाबाद”, “आतंकवाद बंद करो”, “भारत माता की जय”, “मोदी-शाह बांगड्या घाला” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, पुलवामा हल्ल्याचे खरे गुन्हेगार अजूनही सरकारच्या तावडीत नाहीत. अमेरिकेच्या व्हिसा धोरणावर भारतीय नागरिकांना बेड्या ठोकल्या जात असताना मौन बाळगणाऱ्या सरकारने ३७० कलम हटवल्यानंतर दहशतवादमुक्त काश्मीरचा दावा केला होता. परंतु पहलगाम येथे पुन्हा झालेला दहशतवादी हल्ला हा केंद्र सरकारच्या अपयशी संरक्षण धोरणाचा फसलेला नमुना आहे.
शिवसेनेने गृहमंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेत तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी केली. काश्मीरसारख्या संवेदनशील प्रदेशात सुरक्षेचा अभाव असून, सतत सत्तेसाठी सत्तांतराच्या खेळात व्यग्र असलेल्या गृहमंत्र्यांना काश्मीर हाताळणे शक्य नाही, असा आरोपही तिवारी यांनी केला.
या संतप्त आंदोलनात मोदी आणि शाह यांच्या छायाप्रतींना चुड्या अर्पण करून त्यांचा निषेध करण्यात आला आणि पंतप्रधान मोदींनी ५६ इंची छातीचे प्रत्यंतर देत दोषींना पकडून फाशी देण्याचे शिवसैनिकांनी आवाहन केले.
या आंदोलनात प्रीतम कापसे, अब्बास अली, मुन्ना तिवारी, आशीष हाडगे, अपूर्वा पित्तलवार, ललित बावनकर, राम कुकडे, शिवशंकर मिश्रा, सुरेंद्र अंबीलकर, उमेश शहा, मुकेश सूर्यवंशी, भोला पटेल, लव कांबळे, विजय चौहान, विशेष मंचिलवार, इब्राहिम शेख, तौसीफ शेख, पवन शर्मा, निलेश मून, शरद शेंडे, विनय फुलझले, सुमेध नागरारे, सुमित वाघ, आतिश गोंधन्ने, पप्पू शहा, मुकेश शहा, गौरव भूते, गोकुल काटेकर, सोनू अंसारी, अनिल कोसरे, अभिषेक धुर्वे आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.