नागपूर : राज्याच्या महसूल विभागात सध्या एकच खळबळ उडाली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या नव्या आदेशामुळे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर नियंत्रण आणले जाणार आहे. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता कार्यालयातून अनुपस्थित राहणाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.
मंत्र्यांनी केलेल्या या स्पष्ट इशाऱ्यामुळे प्रशासनात एकच खसखस उडाली आहे. जनतेच्या सेवेत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. मुख्यालय सोडताना अधिकाऱ्यांनी आपल्याच वरिष्ठांची परवानगी घेणं अनिवार्य आहे, अन्यथा शिस्तभंगात्मक कारवाई अपरिहार्य ठरेल.
कारवाईचा फोकस कोणावर?
तहसीलदार, अप्पर जिल्हाधिकारी, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, तसेच भूमी अभिलेख विभागातील विविध पदांवरील अधिकाऱ्यांकडून वारंवार विनापरवानगी अनुपस्थित राहण्याच्या तक्रारी महसूल मंत्र्यांकडे पोहोचल्या होत्या. या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर त्यात तथ्य आढळल्याने त्यांनी कडक पावलं उचलली आहेत.बावनकुळे यांनी सांगितले की, कामाचा खोळंबा होतोय, नागरिक त्रासले आहेत, हे सहन केलं जाणार नाही.त्यामुळे कार्यालयातील शिस्त पाळणं आता कर्मचाऱ्यांसाठी ऐच्छिक न राहता बंधनकारक ठरणार आहे.