नागपूर : पहलगाममधील भीषण हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र झाली आहे. सततच्या शोधमोहिमांदरम्यान उधमपूरच्या बसंतगड परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची दुर्दैवी माहिती समोर आली आहे.
दहशतवाद्यांचा छडा लागल्यानंतर सुरू झाली कारवाई-
जम्मू-काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम राबवली. या वेळी दहशतवादी एका घरात लपल्याचं निदर्शनास आलं. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा दिल्यानंतर जोरदार गोळीबाराला सुरुवात झाली आहे. सध्या दोन्ही बाजूंनी चकमक सुरू असून, परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
तिसरी मोठी चकमक-
पहलगाम हल्ल्यानंतर हे तिसरं मोठं ऑपरेशन मानलं जात आहे. याआधी कुलगाममध्ये आणि पूंछमधील लसाना वनक्षेत्रात दहशतवाद्यांविरोधात मोठ्या कारवाया करण्यात आल्या होत्या. भारतीय लष्कराने जम्मू-काश्मीर पोलिसांच्या मदतीने विशेष मोहिम राबवत जंगल परिसरात दहशतवाद्यांचा शोध घेण्याचं काम सुरू ठेवलं आहे.
सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर-
हल्ल्यानंतर बैसरन आणि परिसरातील इतर संवेदनशील भागांत व्यापक प्रमाणात शोधमोहीम राबवली जात आहे. जंगलात कोम्बिंग ऑपरेशनसाठी अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले असून, संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन स्थळांवरही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाई दरम्यान जवानांनी पुन्हा एकदा आपल्या प्राणांची बाजी लावत देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी योगदान दिले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरक्षा दलांकडून प्रयत्न सुरू आहेत.