सातारा: सज्जनगडावर पत्नीचा फोटो काढत असताना पाय घसरून दरीत पडल्याने धनंजय जाधव (३२, सातारा) यांचा मृत्यू झाला. अवघ्या चार महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता.
धनंजय जाधव पत्नी नीलमबरोबर शुक्रवारी दुपारी दर्शनासाठी सज्जनगडावर गेले होते. मारुती मंदिराजवळ दोघेही विसावा घेण्यासाठी थांबले. या वेळी धनंजय जाधव फोटो काढत होते. फोटो काढत असताना दरीच्या दिशेने ते गेले. या वेळी त्यांचा पाय घसरून ते दरीत कोसळले. डोळ्यांसमोर पती दरीत खाली पडल्याने मदतीसाठी आरडाओरडा केला. काही वेळानंतर त्या ठिकाणी काही ग्रामस्थ गेले. मात्र, पती दरीत पडल्याच्या धक्क्याने नीलम बेशुद्ध पडली होती.
त्यामुळे घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांना नेमकी घटना समजू शकली नाही. नीलम शुद्धीवर आल्यानंतर पती दरीत पडले असल्याचे तिने सांगितले. तोपर्यंत अंधार पडण्यास सुरुवात झाली होती.
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी शोधमोहीम सुरू केली. रात्री ११च्या सुमारास धनंजय जाधव यांना शोधण्यात यश आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.