Published On : Mon, Mar 20th, 2017

पुन्हा स्वाईन फ्लूने काढले डोके वर, आरोग्य यंत्रणेत खळबळ

Advertisement


मुंबई:
वातावरण बदलामुळे पुन्हा एकदा स्वाईन फ्लू या आजाराने डोके वर काढले आहे. नाशिक, नगर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूचे काही रूग्ण आढळले आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून नगरच्या श्रीरामपूरमध्ये दोन, पिंपरी-चिंचवडमध्ये पाच तर नाशिकमध्ये तीन मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा खळबळून जाग्या झाल्या आहेत. नगरमध्ये आरोग्य विभागाने तपासणी मोहीम सुरू केली असून, नाशिक व पिंपरी-चिंचवडमध्येही खबरदारी घेण्यात येत आहे.

नुकतीच उन्हाळ्याला सुरूवात झाली मात्र दिवसा कडक ऊन व पहाटेच्या वेळी गारवा अशा वातावरणामुळे विषाणूजन्य आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. तर काही जणांचा मॄत्यूही झाला आहे. स्वाइन फ्लूमुळे सटाणा तालुक्यात दोघांचा, तर सिन्नरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात १४ रुग्ण आहेत. नगरच्या श्रीरामपूरमध्ये एकाच कुटुंबातील एक वर्षाची मुलगी व सव्वातीन वर्षाच्या मुलाला पुण्यातील रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र तेथे त्यांचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवडमध्येही आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू ओढवला आहे. शहरात आतापर्यंत ३१ जणांना लागण झाली असून, संसर्ग होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे महापालिकेच्या आठही रुग्णालयांत विशेष काळजी घेण्यात येत आहे.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

श्रीरामपुरात स्वाइनने दोन मुलांचे मृत्यू झाल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आहे. संपूर्ण जिल्ह्यातच सर्वेक्षण तत्काळ सुरू करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास तत्काळ औषधोपचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. प्रत्येक गावात त्यासाठी सर्वेक्षण कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुग्णांची तपासणी करून तातडीने औषधोपचार करण्याच्या सूचना आहेत. सरकारी दवाखान्यांप्रमाणेच खासगी दवाखान्यातही स्वाइन फ्लूचे रुग्ण उपचारासाठी येत असल्याने तीनही जिल्ह्यांतील स्वाइन रुग्णांचा आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement