उत्तर प्रदेशात बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून का निवडले, याचा उलगडा भल्याभल्यांना झालेला नाही. गोरखपूरच्या मठाचे मठाधीश असलेले संन्यासी आदित्यनाथ यांची उत्तर प्रदेशातील सर्व जातीजमातींमध्ये असलेली लोकप्रियता, कट्टर हिंदुत्ववादी म्हणून प्रतिमा आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अत्यंत शिस्तबद्ध राहिलेले योगी मोदी-शहा यांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरले. अर्थातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या निवडीमध्ये विशेष भूमिका निभावली नाही.
सर्व्हेमध्ये योगी अव्वल
भारतीय जनता पक्ष हा सध्या कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना सर्व्हे करूनच पुढील गोष्टी ठरवितो. अर्थातच, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी कोण, हे ठरवितानाही सर्व्हेचाच आधार घेण्यात आला. अनेक महिन्यांपूर्वी अमित शहा आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे बोलणे झाले. त्यात राजनाथसिंह आणि योगी आदित्यनाथ ही दोनच नावे आमच्यासमोर आहेत, असे शहा यांनी स्पष्ट केले. मात्र, राजनाथ यांनी मुख्यमंत्री होण्यास असमर्थता दर्शविली. तेव्हापासून शहा यांच्या डोक्यात आदित्यनाथ यांचे नाव होते.
उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक सुरू असताना आणि निवडणुकीच्या निकालांनंतरही भाजपने काही सर्व्हे केले. त्यात नागरिकांमध्ये योगी आदित्यनाथ हे राजनाथ यांच्यापेक्षा थोडे पिछाडीवर असल्याचे स्पष्ट होत होते, तर भाजप कार्यकर्त्यांच्या पसंतिक्रमात दोघांनाही समान पसंती होती. अर्थातच, राजनाथ यांनी अनिच्छा दर्शविल्यानंतर योगी आदित्यनाथ यांची निवड करणे मोदी-शहांसाठी विशेष अवघड गेले नाही.
अपार मेहनतीचे फळ
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल या भागात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. अनेक बंडखोरांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या पोटात गोळा आणला होता. मात्र, योगी आदित्यनाथ यांनी ही परिस्थिती अत्यंत हुशारीने हाताळली. ते गावोगावी हिंडले. घराघरांत गेले. प्रत्येकाला हात जोडून भाजप उमेदवारालाच विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याशिवाय त्यांनी उर्वरित उत्तर प्रदेशात जवळपास दीडशेहून अधिक सभा घेतल्या. भाजपच्या विजयासाठी उत्तर प्रदेशातील कोणत्याही भाजप नेत्याने यापेक्षा अधिक कष्ट घेतले नव्हते.
सर्व जातींमध्ये लोकप्रिय
योगी आदित्यनाथ यांचे व्यक्तिमत्त्व उत्तर प्रदेशातील सर्व जातीजमातींमध्ये लोकप्रिय आहे. आदित्यनाथ हे ठाकूर आहेत. मात्र, ते संन्यासी आहेत. त्यामुळे ते सर्व जातीजमातींच्या पलिकडे आहेत. त्याचप्रमाणे गोरखपूर येथील मठाचे अनेक भक्त हे मागासवर्गीय, विशेषतः यादव समाजाचे आहेत. आणखी एक बाब म्हणजे पूर्वांचल भागात भाजपकडे ब्राह्मण नेता नाही. त्यामुळे तेथून योगी आदित्यनाथ यांना स्पर्धा नाही. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशातील जातीय गणिताचे फासेही आदित्यनाथ यांच्याच बाजूने पडले. गोरखपूरमधील पंचायतीला अनेक मुस्लिमही आवर्जून उपस्थित असतात. ते स्वतः उच्चवर्णीय आहेत आणि त्यांचे समर्थक मागासवर्गीय आहेत. असे अनोखे समीकरण आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनवून गेले.
लोकसभेच्या प्रचारादरम्यान अमित शहा हे दोन दिवस गोरखपूर येथील योगी आदित्यनाथ यांच्या मठात राहिले होते. आदित्यनाथ यांच्या ‘साधे राहणे, सोपे बोलणे’ ही गोष्ट शहा यांनी भावली. योगींची शिस्तबद्ध जीवनशैली, नागरिकांबद्दल प्रचंड आत्मीयता, इतिहासाचे ज्ञान आणि कार्यतत्परता या गोष्टी शहा यांना आवडल्या.’
.. As published in Maharashtra Times