मुंबई: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे नाव पुढे करुन भाजपाची केलेली कोंडी स्वतः संघाने फोडली आहे. संघाची राष्ट्रीय कार्यकारिणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती रतन टाटा यांच्या नावाला संमती दर्शवली असून 3 मे रोजी टाटांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
राष्ट्रपतीपदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पुढे करण्यात आले होते. पण अडवाणी यांना पक्षातूनच विरोध आहे. विरोधी पक्षांना मान्य होणारा उमेदवार सध्या भाजपाकडे नाही. शिवसेनेसारख्या मित्रपक्षाची पसंती मिळेल, असेही नाव भाजपाला सुचलेले नाही. त्यातच सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे करुन शिवसेनेने भाजपाला अडचणीत आणण्याची खेळी केली आणि संघानेच ती आता सेनेवर उलटवली.
सारे काही ठरल्याप्रमाणे घडल्यास रतन टाटा हेच भाजपचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार असतील. रतन टाटा हे राष्ट्रनिष्ठ उद्योगपती आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबध आहेत. शिवसेनेसह देशातील सर्वच पक्षांच्या नेत्यांची रतन टाटा यांना पसंती मिळु शकते. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सहमतीने टाटा यांचे नाव पुढे करण्याचा डाव संघाने टाकला आहे.
अर्थात संघाच्या तोंडी टाटांचे नाव अचानक आलेले नाही. संघ वर्तुळातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार काही महिन्यांपासून टाटा आणि संघाचे सूत जुळले आहे. गेल्या 28 डिसेंबर 2016 रोजी टाटा यांनी नागपुरात संघ मुख्यालयाला भेट दिली होती. नागपुरात उतरताच संघाच्या प्रचारकांनी टाटांचे विमानतळावर जाऊन स्वागत केले होते. संघातर्फे सहसा कुणालाही एवढे महत्व दिले जात नाही. तेथून टाटा थेट रेशीमबागेत डॉ. हेडगेवार समाधीस्थळी गेले. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास ते महालस्थित संघाच्या मुख्यालयातही दाखल झाले. तेथे त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी 40 मिनिटे चर्चा केली. याचवेळी रतन टाटा आणि भागवत यांच्यामध्ये राष्ट्रपती पदाबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती संघातील सूत्रांनी दिली.म्हणजे टाटांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्याच्या हालचाली संघाने तीन महिन्यांपूर्वीच सुरू केल्या.
सरसंघचालक भागवत आणि टाटांच्या या नवीन मैत्रीचा प्रवास आठवडाभराने 5 जानेवारी 2017 रोजी चंद्रपुरात स्पष्टपणे दिसून आला. भागवत यांचे होमटाऊन असलेल्या चंद्रपूर शहरात टाटा समूहाने बांबू उद्योगात गुंतवणूक करण्याची घोषणा केली. त्यानंतर वनविभाग आणि टाटा ट्रस्ट यांच्यात बांबू प्रशिक्षण केंद्राबाबत सामंजस्य करार करण्यात आला. संघाच्या अनेक प्रकल्प आणि योजनांमध्ये टाटांचा यापुढे सहभाग राहणार आहे.